भिवंडी महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होताना सर्व निधी देऊन सन्मान

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत सेवा बजावणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या हक्काचे भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी, शिल्लक रजेचे वेतन ,सेवा उपदान या निधीमधील पैसे मिळण्यास मागील काही वर्षात महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्याने खंड पडला होता. त्यास आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी तिलांजली देत कर्मचारी सेवानिवृत्त होत असतानाच्या दिवशी त्यांच्या हाती त्यांचे पैसे देण्याचा उपक्रम पुन्हा एकदा सुरू केला आहे .

आयुक्तांनी भिवंडी महानगरपालिका(bhivandi municiple corporation) प्रशासनाचा पदभार स्वीकारताना आस्थापना विभागाची माहिती घेताना याबाबत आदेश दिला. त्यानंतर आज सेवानिवृत्त(retire) होणारे विनायक शिंदे व आरोग्य मुकादम नारायण आहिर यांना भविष्य निर्वाह निधी ,ग्रॅच्युईटी , शिल्लक रजेचे वेतन ,सेवा उपदान हे चार धनादेशाच्या माध्यमातून देऊन त्यांना आयुक्तांनी निरोप दिला .

या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे व उपायुक्त मुख्यालय डॉ. दीपक सावंत, शिक्षण विभागाचे उपायुक्त सुभाष झळके, भविष्य निर्वाह निधी प्रमुख सुधीर गुरव, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.

भिवंडी महानगरपालिका आर्थिक डबघाईस असताना भविष्य निर्वाह निधी सह इतर ठिकाणी कर्मचाऱ्यांचे जमा होणारे पैसे इतर खात्यात वळविल्याने मागील चार ते पाच वर्षांपासून कर्मचाऱ्यांची देणी प्रलंबित आहेत .सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी मुख्यकायचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यामध्ये निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांचाही समावेश आहे . आजही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सुमारे ६० लाख रुपये देणे धकीत असून लवकरच ते पैसे देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली असल्याची महिती लेखाधिकारी डॉ कालिदास जाधव यांनी दिली आहे. महापालिकेत तब्बल ३५ वर्ष सेवा करून आरोग्य विभागातून कार्यालय अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त होणारे विनायक शिंदे यांनी आपण निवृत्त होण्याच्या दिवशी आपली सर्व रक्कम मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रशासनासह आयुक्तांचे आभार व्यक्त केले आहेत .