महाडच्या पुण्यभूमीत काम करायला मिळाले हे माझे भाग्यच – प्रांताधिकारी इनामदार

महाड : महाड उपविभागाचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची महाड येथे तीन वर्षाची सेवा पुर्ण झाल्याने त्यांची पेण येथे बदली झाली आहे. तीन वर्षाच्या कारकिर्दीत इनामदार यांनी बजावलेल्या कार्याचा गौरव व निरोप देण्यासाठी महाड प्रेस असोसिएशनच्या वतीने एक छोटेखानी गौरव सोहळा प्रांत कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाड प्रेस असोसिएशनच्या वतीने प्रांताधिकारी इनामदार यांचा सन्मान पत्र, शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण कुलकर्णी, कार्याध्यक्ष रविंद्र शिंदे, सेक्रेटरी संजय भुवड, खजिनदार मनोज खांबे, ज्येष्ठ सदस्य श्रीकृष्ण बाळ, संदीप जाधव, सदस्य उत्तम तांबडे, रोहन शिंदे, राजेश भुवड, श्रीकांत पार्टे सिद्धार्थ कारेकर उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी इनामदार यांनी महाडमध्ये हजर होताच किल्ले रायगड येथे जाऊन छत्रपती शिवरायांना नतमस्तक होत तेथील ऊर्जा घेऊन आपण आपल्या कामाला सुरुवात केली. महाड येथे भरपूर काही शिकता आले या अनुभवाचा फायदा आपल्याला पुढील वाटचालीत होईल. सर्वांकडून चांगले सहकार्य मिळाले. आत्तापर्यत झालेल्या आपल्या सेवेत प्रेस क्लबने गोड निरोप दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. असे सांगत ऐतिहासिक महाडच्या पुण्यभूमीत काम करायला भेटले हे माझे भाग्य समजतो असे इनामदार यांनी सांगितले.

 संदीप जाधव यांनी प्रांताधिकारी म्हणून इनामदार यांनी सर्वाशी सलोखा ठेवीत कोणत्याही वादामध्ये न पडता चांगले कार्य केले आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सर्वसामान्य जनतेला कुठलाही पक्षभेद न ठेवता न्याय दिला आहे, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव केला. महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण कुलकर्णी यांनी प्रांताधिकारी इनामदार यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.