मुंबई: सुशांत सिंह प्रकरणावर आज पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली, हे दुर्दैवी आहे, हे खरेतर व्हायला नको होते. पण मीडियामध्ये ज्या चर्चा सुरु आहेत त्याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचे पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवारांनी आपले मत व्यक्त केले.

ते म्हणाले की, एका अभिनेत्याने आत्महत्या करणे दुर्दैवी आहे. पम मीडियात जशा चर्चा सुरु आहेत ते पाहून आश्चर्य वाटते. माझ्या जिल्ह्यामध्ये २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र मीडियाने त्याची नोंदसुद्धा घेतली नाही, अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली.

पवार पुढे म्हणाले , महाराष्ट्र तसेच मुंबई पोलीस सक्षम आहेत. मला त्यांच्यावर १०० टक्के विश्वास आहे. मात्र तरीही  सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा, असे वाटत असल्यास मी विरोध करणार नाही. चौकशी कोण करणार हा राज्य सरकार आणि सीबीआयचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी सगळं सुरु आहे का असे विचारले असता पवारांनी या मागचा हेतू काय आहे हे मी सांगू शकत नाही, असे म्हटले. तसेच पार्थ पवारने सुशांतच्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे त्याविषयी विचारले असता पार्थच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असे पवार म्हणाले.