वीज देयके माफ न केल्यास भाजपचा आंदोलनाचा इशारा

नागोठणे : कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण देशात लाॅकडाऊन सुरु करण्यात आले होते. यामुळे  रायगड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात व खुप दिवस लाॅकडाऊन करण्यात  आला. जिल्ह्यातील काही ठिकाणी तर अजूनही लाॅकडाऊन करण्यात येत आहे. तसेच चक्रीवादळामुळेही जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. असे असतांनाच सध्या नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून पाठविण्यात आलेली भरमसाठ वीज देयके पूर्णतः माफ करावीत व त्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावेत अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने वीज वितरण व राज्यसरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाच्या नागोठण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वीज वितरण कंपनीचे नागोठण्यातील कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला.

भाजपाचे रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, भाजपाचे नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, भाजपा रोहा तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष रऊफ कडवेकर, नागोठणे शक्ती प्रमुख सिराजभाई पानसरे,  भाजपाचे रोहा तालुका उपाध्यक्ष शेखर गोळे, नागोठणे विभागीय चिटणीस ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, नागोठणे शहर महिला आघाडी अध्यक्षा श्रेया कुंटे, नागोठणे शहर उपाध्यक्ष गौतम जैन, केदार कुंटे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यासंदर्भात वीजवितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी सांगितले की, वीज देयके जर चुकीची आली असतील तर त्याची शहानिशा करुन ती दुरुस्त करुन देण्याचे काम सुरू आहे. मात्र वीज देयके पूर्णतः माफ करण्याचा निर्णय हा मंत्री मंडळ व वरिष्ठ पातळीवर होत असल्याने नागोठणे भाजपाच्या वतीने देण्यात आलेले हे निवेदन आपण वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.