सुजलाम् सुफलाम भारतातील शेतकरी आत्मनिर्भर,स्वावलंबी होतील का ? : जयवंतराव भाकरे

भारताला स्वातंत्र्य मिळवून जवळपास ७३ वर्ष पूर्ण झाली असताना सुजलाम् सुफलाम भारतातील शेतकरी आत्मनिर्भर, स्वावलंबी होतील का ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का ? असा यक्ष प्रश्न प्रगतीशील शेतकरी जयवंतराव भाकरे यांनी व्यक्त केला आहे.

कवठे येमाई (प्रतिनिधी) : भारताला स्वातंत्र्य मिळवून जवळपास ७३ वर्ष पूर्ण झाली असताना सुजलाम् सुफलाम भारतातील शेतकरी  आत्मनिर्भर, स्वावलंबी होतील का ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का ? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रश्नांची इत्यंभूत व सखोल माहिती असणारे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजीच्या भाकरेवाडीतील प्रगतीशील शेतकरी जयवंतराव भाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

भाकरे यांच्याशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी संवाद साधला असता ते म्हणाले की, आपला भारत देश शेतीप्रधान आहे, आपली भौगोलिक परिस्थिती बऱ्याच पिकांना अतिशय चांगली आहे, त्यानुसार घेतलेल्या पिकांपासून उत्पादनही चांगले मिळते. जगात त्याची मागणीही मोठी आहे, असे असताना शेतकऱ्यांचे कैवारी समजणारे देशातील अनेक राजकीय नेते याला अडथळा का घालतात?

 राज्यासह देशात दुधाचे उत्पादन भरपूर होते, अनेकदा दूध उत्पादकांना योग्य भावाअभावी दुध ओतून द्यायची वेळ येते, निर्यातीला भरपूर वाव असताना आपले सरकार दुधाची भुकटी आयात करते.

देशात उसाचे उत्पादन चांगले होते, साखर रिकव्हरीही बरी आहे, उत्पादनही चांगले आहे, निर्यात करून पैसे मिळू शकतात पण सरकार कच्ची साखर आयात करते. तूर, हरभरा, मटकी, हुलगे अशी कडधान्ये आपल्याकडे चांगली उत्पादित होतात ते उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना कधीच प्रोत्साहन मिळत नाही. उत्पादित मालाला योग्य भाव मिळण्याकामी अनेकदा शेतकऱ्यांनाच संघर्ष करावा लागतो. पण सरकार कडधान्ये, डाळी आयात करते.

कांदा तर भारतभर चांगला पिकतो, जगात एक नंबर असतो, कांदा निर्यातीला भरपूर संधी असताना सरकार कांदा  निर्यातीवर बंदी घालून, निर्बंध टाकून विदेशातून महागडा  कांदा आयात करते.

या व अशाच शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या अनेक प्रश्नांचा सरकार, लोकप्रतिनिधी,शेतकरी नेते यांच्याकडून विचार का होत नाही? का सरकार शेतकरी विरोधी धोरणे आखते?

परकीय चलन मिळणार असूनही सरकार यावर विचार का करत नाही ?

यामुळे शेतकरी श्रीमंत होतील अशी भीती वाटते का ? असे कितीतरी प्रश्न माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वारंवार सतावत आहेत. केंद्र व राज्य सरकारमध्ये निम्म्याहून जास्त प्रतिनिधी शेतकऱ्यांची मुले आहेत तरी का नाही विचार करत शेतकऱ्यांच्या या विविध प्रश्नांचा ? का ठोस उपाय योजना राबविल्या जात नाहीत शेतकऱ्यांच्या हिताच्या ?  खरंच कोणी देईल का याकडे लक्ष ?  होईल का भारत सुजलाम् सुफलाम. होतील का शेतकरी आत्मनिर्भर, स्वावलंबी ? थांबतील का शेतकऱ्यांच्या आत्महत्या ?