पनवेलमध्ये मनसेने विरुपाक्ष मंदिर भाविकांसाठी केले खुले

पनवेल : तुम्ही मंदिरे खुली करणार नसाल तर राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही ती लोकांसाठी खुली करू ,असा पवित्रा घेत मनसेने पनवेलमधील विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून महाआरती करून मंदिर भाविकांसाठी खुले केले.
राज्यात मॉलसह इतर दुकाने आणि दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देणार्‍या सरकारच्या बेगडी पुरोगामित्वासाठी यापुढे भक्तांची आणि देवाची ताटातुट महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. ज्याप्रमाणे समुद्र मंथनावेळी महादेवाने विष प्राशन करून सृष्टीला प्रलयापासून वाचवले होते त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटातून देशाला वाचवण्यासाठी महादेवांना साकडे घालण्यात येत असून त्यासाठी पनवेलमधील विरुपाक्ष मंदिराचे टाळे तोडून भाविकांसाठी मनसेने खुले केल्याचे मनसे सैनिक संजय मुरकुटे यांनी टाळे तोडल्यावर सांगितले .
यावेळी पनवेल मनसेचे अतुल चव्हाण, योगेश चिले, अविनाश पडवळ, यतिन देशमुख, पराग बालड, रोहित दुधवडकर, अमोल बोचरे, राहुल चव्हाण, निर्दोष गोंधळी, राहुल पाटील, अमोल पाटील, प्रसाद परब, कैलास माळी, आकाश देशमुख, संजय मुरकुटे, प्रकाश लाड, विजय पवार, रोशन पाटील, अनिकेत मोहिते, सचिन जाधव, हे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.