भिवंडीत स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात साजरा

भिवंडी: भिवंडी ग्रामीण व शहर परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शनिवारी सकाळी रिमझिम  पाऊस असतानासुध्दा पालिका, प्रांत,तहसील,पंचायत समिती, बालसुधारगृह ,पोलीस उपायुक्त कार्यालय आदी ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शहरातील मुस्लीम मोहल्यातसुद्धा तिरंगा ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा कार्यक्रम पार पडला.कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिका व इतर शासकीय कार्यालयात बहुतांश नगरसेवक व नागरीक अनुपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने भिवंडी पालिकेच्या प्रांगणात सकाळी ८:१५ वा.महापौर प्रतिभा पाटील यांच्या शुभहस्ते झेंडावंदन झाले. यावेळी आयुक्त डॉ.पंकज आशिया यांच्यासह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रांत कार्यालय व बाल सुधारगृह येथे उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर यांनी झेंडावंदन केले. यावेळी बालसुधारगृहाचे सचिव दिलीप कलंत्री,पोलीस उपायुक्त  राजकुमार शिंदे,तहसील कार्यालय येथे तहसीलदार शशिकांत गायकवाड,समदनगरमध्ये एमआयएम कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्ष खालिद गुडु ,काँग्रेस कार्यालयात शोएब गुड्डू तर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संतोष शेट्टी यांनी तर राष्ट्रवादी कार्यालयात महिला शहराध्यक्ष स्वाती कांबळे यांच्या हस्ते झेंडा वंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.त्यापूर्वी मध्यरात्री १२ वा.अजयनगर, शिवसेना शहर शाखा येथे  माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.