उद्योगमंत्र्यांनी जाणून घेतल्या उद्योजकांच्या समस्या, कारखाने सुरु करण्याचे संकेत

 कल्याण : कोरोना संकटामुळे राज्यासह संपूर्ण देशाचेच अर्थचक्र ठप्प झाले आहे. या अर्थचक्रास गती देण्यासाठी रिस्टार्ट या मोहिमेंतर्गत आज दुपारी वेबिनारद्वारे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून ज्याप्रमाणे औरंगबाद येथे कारखाने सुरू करण्यात आले त्याचप्रमाणे तळोजा, अंबरनाथ, कल्याण -डोंबिवली, वागळे इंडस्ट्री येथील एमएमआरडीए भागातील कारखाने लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी  या वेबिनारमध्ये उद्योजकांना सांगितले. त्यामुळे डोंबिवली येथील जवळपास १ लाख कामगारांच्या हाताला पुन्हा रोजगार मिळेल अशी माहिती  कल्याण – डोंबिवली मॅन्युफॅक्चर असोशिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी बोलताना सांगितले. 

यावेळी सुभाष देसाई यांनी अत्यावश्यक सेवेतील कारखान्याबरोबरच इतर कारखानेदेखील सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यासमोर प्रस्ताव मांडला असल्याचे सांगतानाच पुन्हा त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले, तर कारखानदारांचे गेल्या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारखानदारांना कर भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. अजून एक महिना मुदत वाढवून मिळेल का यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विलगीकरण दिवसाचा कालावधी कमी करा, कच्चा माल, उत्पादने ने- आण करण्यासाठी जिल्हा अंतर्गत वाहतूक सुरू करावी, मजुरांच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुरू करावी. कर्मचारी विमा बाबत समस्या सोडवाव्या आणि पाणी कर मुळ दराप्रमाणेच आकारावा अशा मागण्या यावेळी कारखानदारांनी केल्या. कारखानदारांचे गेल्या चार महिन्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लवकरात लवकर कारखाने सुरू करावे अशी मागणी करतानाच डोंबिवलीत सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुरळीत नसल्याने ककर्मचारी येत नसल्याची माहिती यावेळी देवेने सोनी यांनी उद्योगमंत्र्यांना दिली.

 कोरोना हा आजार सोसयाट्यांमधून एकवेळ वाढू शकतो पण कारखाने सुरू केल्यामुळे कोरोना वाढणार नाही असे सांगतानाच  कारखानदार निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टींचा नक्कीच वापर करतील तसेच कोरोना वाढू नये यासाठी सर्व नियामांचे पालन करतील असे मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. यावेळी प्रधान सचिव शेट्टी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अनबलग या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.