sanitizer

एका पत्रकारासह त्याच्या मित्राची जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. बलरामपूरमध्ये करण्यात आलेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

लखनौ: उत्तर प्रदेशातील(uttar pradesh) गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिले नसल्याचे दिसून येत आहे. येथे दर एक दोन दिवसाआड खून आणि अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशातच, एका पत्रकारासह त्याच्या मित्राची जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याच्या घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. बलरामपूरमध्ये करण्यात आलेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बहादूरपूर येथे जंगलातून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली.(journalist fired with spreading sanitizer on his body 3 people arrested) ललित मिश्रा, केशवानंद मिश्रा उर्फ रिंकू आणि अक्रम अली अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनीही चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला आहे.

२७ नोव्हेंबर रोजी पत्रकार राकेशसिंग आणि त्यांचा ३४ वर्षीय मित्र पिंटू यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह बलरामपूर जिल्ह्यातील केवलारी गावातील एका घरात सापडला होता. घराला लागलेल्या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. पोलिस घटनास्थळी दाखल होण्याआधीच पिंटू याचा मृत्यू झाला होता. परंतु, वेदनेने विव्हळत असलेल्या राकेशला पोलिसांनी ताबडतोब रुग्णालयात हलवले. रुग्णालयात पोहचल्यानंतर काही तासांतच राकेश यांनीही प्राण सोडले. मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात पत्रकार असलेल्या राकेश यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक सरपंच आणि त्यांच्या मुलाने केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध लिहिल्याने हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

बलरामपूरचे पोलीस अधिक्षक देवरंजन वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, केशवानंद याची आई गावाची प्रमुख होती. पत्रकार राकेशसिंग यांनी केशवानंद यांच्या आईने केलेला घोटाळा उघड केला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. चर्चा करण्याच्या निमित्ताने आरोपी राकेशसिंग यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी राकेशसिंग आणि त्यांच्या मित्राला मद्य पाजले आणि त्यांची हत्या केली. घर जाळण्यासाठी आरोपींकडून अल्कोहोल असणारे सॅनिटायजर वापरण्यात आले, जेणेकरून हा अपघात आहे, असे वाटावे. केमिकलच्या सहाय्याने घर जाळण्यासाठी ललित मिश्रा आणि केशवानंद मिश्रा यांनी अक्रम अली उर्फ अब्दुल कादिरची मदत घेतली. अशा प्रकारचे गुन्हे त्याने याआधीही केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राकेशसिंग एका स्थानिक वृत्तपत्रासाठी काम करत होते. आगीमध्ये राकेशसिंग यांचा मित्र पिंटू साहू गंभीररित्या भाजला होता. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राकेश सिंग ९० टक्के भाजले होते. लखनौ रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राकेशसिंग यांच्या वडिलांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने कुटुंबाला पाच लाखांची मदत दिली आहे.