कल्याणच्या नगरसेवकाने दिला ‘त्या’ रिक्षाचालकाला मदतीचा हात

कल्याण : कल्याण(kalyan) पूर्वेतील शिवाजी कॉलनीमध्ये रहाणारे रिक्षा चालक(rickshaw driver) मिलिंद पवार यांची रिक्षा सोमवारी रात्री काही समाजकंटकांनी पेटवून दिली. यामुळे पवार कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले. अचानकपणे कोसळलेल्या या संकटामुळे पवार कुटूंब हवालदिल झाले होते. या घटनेची खबर लागताच शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड(mahesh gaykwad) यांनी पवार कुटुंबियांना आर्थिक मदत केली.

गेल्या पाच महिन्यांपासून अधिक काळ लॉकडाऊनमुळे सर्व रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. सध्या अनलॉक प्रक्रियेत रिक्षाचालकांना दोन प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत रेल्वेची लोकल सेवा सुरु होणार नाही तोपर्यंत रिक्षा व्यवसायाला सध्या तरी काहीच कमाई नसल्याची परिस्थिती आहे. अशाच परिस्थितीत रिक्षा उभी करण्याच्या वादातून पवार यांची रिक्षा काही अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पवार यांच्या रिक्षाचे सुमारे ५० टक्क्याहून अधिक नुकसान झाले असल्याने ही रिक्षा दुरुस्त होऊ शकत नसल्याने या रिक्षा दुरुस्तीचा सपूर्ण खर्च आपण उचलत असल्याचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले. या बाबतची तक्रार (complaint)पवार यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिली असून या रिक्षा जळीत प्रकरणाचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.

तर रिक्षा चालक मिलिदं पवार यांना जळलेल्या रिक्षाच्या दुरस्तीकरिता चाळीस हजार रुपये मदतीचा धनादेश(cheque) कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष प्रकाश पेणकर, शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख शरद पाटिल यांच्या हस्ते देण्यात आला.