जादा बिले आकारणाऱ्या १५ रुग्णालयांवर कल्याण डोंबिवली पालिकेची कारवाई

कल्याण : शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच रुग्णांकडून बिलाची आकारणी करावी, असे महापालिकेने निर्देश देवूनही काही रुग्णालये अवाजवी दराने बिलाची आकारणी करतात. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका मुख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली, विनय कुलकर्णी यांच्या  भरारी पथकाने आत्तापर्यंत १५ रुग्णालयांना नोटीसा बजावून  ३१.४५ लक्ष रक्कम आक्षेपित केली आहे. त्यापैकी १६.१५ लक्ष रुग्णालयांकडून वसूल करुन रुग्णांना परत केली आहे. तर काही रक्कमा प्रत्यक्ष बिलातून कमी केल्या आहेत.

कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयाने देखील शासनाने २१ मे २०२० च्या परिशिष्ट क मध्ये निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा आकारणी करुन रुग्णांना जादा रक्कमेचे बिल देणे, वाढीव रक्कम देण्याकरीता रुग्णांची अडवणूक करुन त्यांना डिस्चार्ज न देणे, परिशिष्ट क प्रमाणे निश्चित केलेल्या दरांचा डिस्प्ले न करणे, ८० टक्के व २० टक्के बेडची स्वतंत्र नोंद न ठेवणे व रुग्णांस त्याविषयी माहिती न देणे, भरारी पथकास सर्व बिले तपासणीसाठी उपलब्ध करुन न देणे,यास्तव त्यांच्याविरुध्द कारवाई का करणेत येवू नये?  हॉस्पिटलचा महापालिकेच्या दप्तरी असलेला नोंदणी परवाना रद्द का करण्यात  नये?, अशा आशयाची नोटीस महापालिकेने बजावली आहे.