कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांनी केली नव्या गॅस शवदाहिनीची पाहणी

कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या पालिका क्षेत्रात वाढत असतानाच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. वाढती कोरोना मृतांची संख्या लक्षात घेता कोरोना मृतांवर महापालिका मोफत अंत्यसंस्कार करणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.  कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो स्मशानभूमीत गॅसवर चालणारी शवदाहिनी सुरु करण्यात आली आहे. या शवदाहिनीची पाहणी आयुक्तांनी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

याआधी महापालिका क्षेत्रात पाच शवदाहीन्या कार्यरत होत्या. आता आणखी एक शवदाहिनी सुरु झाल्याने महापालिका हद्दीत शवदाहिन्यांची संख्या सहा झाली आहे. डोंबिवलीत पाथर्ली, शिवमंदीर, कल्याणमध्ये बैलबाजार, लाल चौकी, विठ्ठलवाडी याठिकाणी शवदाहिन्यांची सुविधा होती. याकामी ५९.७६लक्ष रू खर्च करण्यात आला असुन या स्मशानभुमीमध्ये नवीन अतिरिक्त ५ स्टॅन्डची शवदाहिनी बांधणे, प्रार्थना सभागृह बांधणे, वाढीव प्रतिक्षालय गॅलरीचे बांधकाम करणे, या कामासाठी १४१.००लक्ष रूपये खर्च करीत प्रेम ऑटो मुरूबाड रोड स्मशानभुमीत सोयी सुविधा केल्याने स्मशानभुमीचे रुप पालटले आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार हा शवदाहिनीत केला जात होतो. कोरोनाचा मृतदेह हा प्लॅस्टीकमध्ये बांधून दिला जातो. त्यावर अंत्यसंस्कार केल्यावर प्लॅस्टीक हे शवदाहिनीत अडकते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात काही शवदाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.  १२ जुलैपासून या शवदाहिन्या पुन्हा कार्यान्वीत करण्यात आल्या असून प्रेम ऑटो येथील शवदाहिनी ही गॅसवर चालणारी आहे. आता कोरोनाच्या मृतदेहांवरही साध्या पद्धतीनेही अंत्यसंस्कार करता येऊ शकतो. त्याला तशी मुभा दिली असून प्रेम ऑटो स्मशानभूमीत लाकडे जाळूनही अंत्यसंस्कार करण्यासाठी आठ बेड्स आहेत.

कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेकडून लाकडे पुरविली जाणार असून मोफत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, शहर अभियंता सपना कोळी, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, उप अभियंता सशीम केदार,  पीआरओ माधवी फोफळे, जे ई दिलिप शिंदे, माजी नगरसेवक विद्याधर भोईर यांच्या समवेत पत्रकारांनी प्रेम ऑटो मुरूबाड रोड स्माशनभुमीचा शुक्रवारी संध्याकाळी पाहणी दौरा  करून सोयी सुविधांची पाहणी केली.