अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनरमुळे कल्याण डोंबिवलीचे विद्रुपीकरण

कल्याण : अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनरमुळे शहाराचे विद्रुपीकरण होत आहे. परवानगी न घेता अनधिकृत होर्डिंग्ज लावल्याने मनपाचे आर्थिक नुकसान केल्याबाबत उचित कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ग्राहक सरंक्षण कक्षाचे कल्याण तालुका प्रमुख विजय देशेकर यांनी पत्राद्वारे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आर्थिक बोजा सहन करून नागरिकांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी  कसरत करत आहे. टिटवाळा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठे बॅनर लागले आहेत. त्यांच्या अधिकृततेबाबत शंका असुन त्याबाबत सखोल चौकशी करून ते अनधिकृत असल्यास त्यावर कारवाईची मागणी होत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या योग्य त्या कलमाखाली तसेच महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियमाच्या कलम ३ व ४ अंतर्गत परवानगी न घेता किंवा अनधिकृत होर्डिंग्जवर लावलेल्या बॅनरला परवानगी नसल्यास त्यांच्यावर मनपाचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल उचित व कठोर कार्यवाही करून टिटवाळा शहराचे होत असलेले विद्रुपीकरण व मनपाचे होत असलेले नुकसान थांबवावे , अशा आशायचे पत्र विजय देशेकर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले आहे.