gym

कल्याण :  कल्याण डोंबिवली महापालिकेने बाजारपेठेतील दुकाने, मार्केट सुरू करण्यासाठी नियम व अटींसह व्यापाऱ्यांना परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर जिम सुरू करण्यासाठीदेखील परवानगी द्यावी, यासाठी डोंबिवली जिम ओनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी आज मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली.

कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी ५ महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवलमधील व्यापाऱ्यांची दुकाने तसेच बाजारपेठ सुरु झाली आहे. त्यामुळे आता कल्याण डोंबिवलीमधील जिमदेखील सुरू करा, अशा मागणीचे पत्र घेऊन पदाधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेतली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वच व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामध्ये जिम मालकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलेल्या दुकान सुरू करण्याच्या परवानगीच्या धर्तीवर जिममालकांनादेखील जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी,अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे केली आहे.

शासन आणि महापालिकेने सांगितलेल्या नियम व अटींचे पालन करून आम्ही जिम सुरू करण्यास तयार असल्याचे जिम मालकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या कालखंडात जिम मालकांचेदेखील मासिक भाडे, वीजबिल थकले आहे. त्याचप्रमाणे जिममध्ये काम करणारा कामगार वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने जिम मालकांनादेखील काही प्रमाणात सूट द्यावी, अशी मागणी जिममालकांनी केली आहे.

कल्याण डोंबिवली मध्ये ९०% जिम चालक हे मराठी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठा आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांचे पुनश्च : हरी ओम केलं मात्र आता जिम चालकांच कधी करणार ? असा प्रश्न सध्या चालकांसमोर आहे. येत्या काही दिवसात  जिम मालक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता जिम चालकांच्या मागणीला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त सकारात्मक प्रतिसाद देत मराठी उद्योजकांना न्याय  देणार का हे पाहावे लागेल.