गणपती विसर्जन तलावांच्या स्वच्छतेकडे कल्याण डोंबिवली पालिकेचे दुर्लक्ष

कल्याण : गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र कल्याण डोंबिवली परिसरामध्ये असलेल्या सर्व गणेश विसर्जन घाट आणि तलावावर अद्यापही त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची साफसफाई झाली नसून त्या ठिकाणी कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणावर विसर्जनासाठी येत असून त्वरित या विसर्जन तलाव आणि गणेश घाटांची साफसफाई करण्याची मागणी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन योगेश कुलकर्णी यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये गणपती विसर्जनासाठी अनेक विसर्जन तलाव, खाडी किनारी असलेले गणेश घाट, कृत्रिम तलाव आदी ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात येते. याठिकाणी हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यानजीक असलेला गणेश घाट, आधारवाडी जेलच्या बाजूचा तलाव, गौरी पाडा तलाव, परिवहन डेपो गणेश घाट, गांधारी गणेश घाट, कचोरे खाडी गणेश घाट, कल्याण पूर्वेतील नांदिवली तलाव आदी ठिकाणी गणपती विसर्जन करण्यात येते.  यापैकी बहुतांश ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून साफसफाई करण्यात आलेली नाही.

गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर आला असताना गणपती विसर्जन स्थळांची वाईट अवस्था असणे हे चुकीचे असून याबाबत महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी पालिका आयुक्तांना पत्र देत लक्ष वेधले आहे. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित आदेश देऊन या विसर्जन स्थळांची साफसफाई करण्याची मागणी केली आहे.