कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा होणार ऑनलाईन

कल्याण :  गेले काही महिने कोरोनामुळे कल्याण डोंबिवली( kalyan dombivali) महापालिकेची सर्वसाधारण सभा झालेली नव्हती. त्यामुळे महापालिकेचा २०२०-२१ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पही( budget) मंजूर झालेला नाही. म्हणूनच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत पालिकेची  महासभा होणार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार महासभा ऑनलाईन(online meeting) घेण्याचा निर्णय महापौर विनीता राणे यांनी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता ही महासभा होणार असून, त्यात महापालिकेचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

फेब्रुवारीमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडून स्थायी समितीला सादर करण्यात आला होता. अंतिम मंजुरीसाठी मार्चमध्ये महासभेचे आयोजन केले होते. परंतु, कोरोनामुळे मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे सर्व सरकारी कामकाजही ठप्प झाले. यात कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभाही होऊ शकली नाही. परिणामी, महापालिकेचा २०२०-२१ चा अर्थसंकल्पही मंजूर करता झालेला नाही.

दरम्यान, जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू झाल्याने यात सोशल डिस्टन्सिंगचे(social distancing) पालन करून महासभा घ्यावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी महापौरांकडे केली होती. तर, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक रमेश जाधव यांनीही नुकतेच निवेदन देत महासभा न झाल्याने अनेक प्रश्न, समस्या लोकप्रतिनिधींना प्रशासनाकडे मांडता आलेल्या नाहीत. याकरिता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत महासभा घ्यावी, अशी मागणी केली होती.