खारघरमधील वसतिगृह लवकरच सुरु होणार

पनवेल : खारघरमधील पांडवकडा धबधबा, इस्कॉन मंदिर, सेंट्रल पार्क आदी पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अल्प दरात निवास करता यावा यासाठी उभारण्यात आलेले वसतिगृह लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी दिली.
आज आदिती तटकरे यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत वसतिगृहाची पाहणी केली. राज्य पर्यटन विकास महामंडळाने खारघर सेक्टर १२ येथे ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलशेजारी प्लॉट न. १० येथील राखीव भूखंडावर चार मजली वसतिगृह उभारले आहे. वसतिगृहात २९ खोल्या, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, ग्रंथालय, वाचनालय आदी सुविधा आहेत. मात्र हे वसतिगृह गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडून असल्याची माहिती लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून तटकरे यांना मिळाल्याने शुक्रवारी आदिती तटकरे यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख आणि पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत वसतिगृहाची पाहणी केली.
पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे हा विभाग आहे.  या परिसरातील पांडवकडा धबधबा आणि परिसरातील पर्यटनस्थळांना चालना मिळावी, याविषयी आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते लवकरच वसतिगृह खुले केले जाईल, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.