रिक्षा भाडेदरवाढ करण्याची कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाची मागणी

कल्याण : रिक्षा व्यावसायिकांच्या महागाई निर्देशनानुसार गेली पाच वर्ष प्राधिकरणाकडे निर्णया अभावी भाडेदरवाढ  प्रलंबित असून ही भाडे दरवाढ करण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा- टॅक्सी महासंघाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

रिक्षा व्यवसायाशी संबंधित असलेले घटक इंधन, स्पेअर पार्ट, टायर, ट्युब, ऑईल, दुरुस्ती खर्च, ऑटो रिक्षा खरेदी दर, इन्शुरन्स व विविध शासकीय शुल्क यांच्या दर व रकमेत वारंवार वाढ झालेली आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढूनही गेली पाच वर्षे ऑटोरिक्षा भाडेदरवाढ केलेली नाही. एक सदस्यीय हकीम समितीचा अहवाल रद्द करून त्याऐवजी भाडेसूत्र ठरविण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अहवालामध्ये ऑटो भाडेदरवाढ करण्याची शिफारस केलेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर २१ मार्चपासून लॉकडाऊन, जनता कर्फ्यू, संचारबंदी यामुळे ऑटोचालक बेरोजगार होऊन त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होऊन त्यांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झालेला आहे. मार्चनंतर भारत स्टेज ६  मानांकन सुरु झाले आहे. भारत स्टेज ६ मानकांच्या ४ स्ट्रोक ऑटोरिक्षांच्या किंमतीमध्ये १७५०१ रुपयांची व इन्शुरन्स प्रिमीयममध्ये १३९६ वी वाढ झालेली आहे. परंतु मार्च २०२० पासून कोगेनाच्या संकटामुळे व देशभरातील लॉकडाऊन संचार बंदीमुळे एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रात बी.एस.६  मानकांच्या ४ स्ट्रोक ऑटो रिक्षांची संख्या २५०  ते  ३०० वाढू शकली नाही. लॉकडाऊनच्या काळात होरपळेलल्या रिक्षाचालकांना विनाविलंब टेरिफ पहिला फ्लॅग १.५ (दिड किलोमीटर) २२ रूपये प्रमाणे व पुढील प्रत्येकी किलोमीटर १४ रुपये, पर लगेज ५ रुपये अशी भाडेदरवाढ देण्याबाबत एम.एम.आर.टी.ए  समितीला योग्य ते निर्देश देण्याची मागणी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे. याबाबत कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी पत्र दिले आहे.