award to kolhapur

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत विविध निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा २० जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मुंबई: स्वच्छ भारत अभियान(swachch bharat abhiyan) (ग्रामीण)अंतर्गंत सर्वंकष आणि सातत्यपुर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्काराने(national award for cleaning to nashik and Kolhapur district) सन्मानित करण्यात आले.

जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सरपंच संवाद आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया व विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत विविध निकष ठरविण्यात आलेले आहेत. ज्या जिल्ह्यांनी सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा २० जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. ठरविलेल्या निकषांमध्ये १०० % हागणदारीमुक्त जिल्हा असणे, वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयी स्थानिकांमध्ये अधिकाधिक जागृकता निर्माण करणे, त्यांना योग्य ती माहिती पुरविणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांच्याशी संवाद वाढविणे या बाबींचा समावेश आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री श्री.शेखावत यांच्याशी सवांद साधला.

नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आनंद व्यक्त करीत संबंधित जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी, अधिकारी व सर्व यंत्रणेने केलेल्या श्रमाची ही फलश्रुती असल्याचे सांगितले. २ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, ग्रामीण स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र यापुढेही अग्रेसरच राहील आणि राज्यातील ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावेल यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रयत्नशील राहील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.