साखर कारखान्यांमध्ये कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्याची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

कोल्हापूर:  आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून १०० खाटांचे अद्ययावत ऑक्सीजनेटेड कोव्हिड केअर सेंटर सुरु करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसिलदारांना केली आहे.

जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी कालच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाकडून १०० खाटांचे अद्यावत ऑक्सीजनेटेड कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात यावे, असे निर्देश दिलेले आहेत. ही केंद्रे पुढील कालावधीत कारखानास्थळावर येणाऱ्या ऊस तोडणी मजुरांसाठीसुद्धा वापरता येतील. त्या दृष्टीने आतापासून अशी केंद्रे तातडीने अस्थापित करावीत व केंद्राचे संपूर्ण व्यवस्थापन संबंधित कारखान्यांकडून केले जावे, असे देसाई म्हणाले.

तहसिलदारांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या साखर कारखाना प्रशासनाशी संपर्क करुन कारखाना कार्यस्थळावर किमान १०० खाटांचे ऑक्सीजनेटेड सुविधेसह अद्यावत कोव्हिड केअर सेंटर तयार करण्यात यावे. कोव्हिड केअर सेंटरच्या ठिकाणी कारखाना प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याविषयी तहसिलदारांनी पत्र व्यवहार करावा. ज्या कारखाना स्थळावर कारखान्यांची स्वत:ची जागा उपलबध नसल्यास तहसिलदारांनी आपल्या स्तरावरुन आवश्यक इतकी जागा (हॉल/सभागृह) उपलब्ध करुन देण्यात यावे. कोव्हिड काळजी केंद्र तात्काळ उभे करुन तालुक्यातील कोव्हिड -१९ रुग्णांना लाभ दिला जाईल, या विषयी आपल्या स्तरावरुन खातर जमा करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.