कोनगाव ग्रामपंचायतीने गणेशोत्सवासाठी केले नियोजन

भिवंडी: भिवंडी तालुक्याच्या कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊन तेथे मृत्यूची संख्याही अधिक असल्याने येणाऱ्या गणोशोत्सव काळात तो साधेपणाने व दीड दिवसांचा साजरा करावा व विसर्जन करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी यांच्यामार्फत नियोजन केले असल्याची माहिती सरपंच डॉ रुपाली अमोल कराळे यांनी दिली आहे .

कोनगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगून दिड दिवसांचा व जास्तीत जास्त पाच दिवसांच्या गणेशोत्सवाचे आयोजन करावे. साधेपणाने उत्सव साजर करावा व त्या दरम्यान आपल्या घरी पाहुणे न बोलविता घरातील मंडळींनी बाप्पाची सेवा करावी, असे आवाहन सरपंच डॉ रुपाली कराळे यांनी केले आहे. गणेश विसर्जनासाठी ग्रामपंचायत स्तरावर जास्त विसर्जन घाट बनविण्यात येणार असून त्या ठिकाणी गणेशमूर्ती घेऊन फक्त दोन गणेशभक्त जाऊ शकणार आहेत. तर प्रत्येक वॉर्डात नेमून दिलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे गणेशमूर्ती सुपूर्द केल्यास त्याचे विधिवत विसर्जन करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .