पानटपरीचा गल्ला चोरल्याच्या आरोपावरून कामगाराची हत्या

कल्याण : पानटपरीवर काम करणाऱ्या कामगाराने गल्ल्यातील पैसे चोरल्याच्या आरोपातून टपरी मालक सुनील पटेल याने आपल्या दोन साथीदाराच्या मदतीने कामगार सुरीज पाल याची हत्या करून टपरी जवळील दलदलयुक्त तलावात मृतदेह फेकून पुरावा नष्ट केला होता. मात्र पोलिसांनी कोणतीही तक्रार नसतानाही घातपाताच्या संशयावरून तपास करत या गुन्ह्याचा(crime) छडा लावत आरोपीना अटक केली आहे.

उत्तरप्रदेशमधून कामाच्या शोधात आलेला सुरज पाल महिन्या भरापासून सुनील पटेल याच्या पानाच्या टपरीवर काम करत होता. ही टपरी कल्याण क्राईम ब्रांचच्या कार्यालया समोर आहे. मागील दोन ते चार दिवसांपासून टपरीवर काम करणारा कामगार दिसत नसल्यामुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल खिल्लारे यांनी त्याची चौकशी केली असता त्यांना मिळालेल्या उत्तरावरून त्यांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी याबाबत चर्चा केली. यानंतर या इसमाचा शोध सुरु केला असता टपरी मालकाने आपल्या अन्य दोन साथीदारासह या कामगाराची बेदम मारहाण करत हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह गोणीत बांधून पाठीमागील नाल्यात प्लायवूडच्या खाली दाबून ठेवल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुनील पटेल याला अटक केली आहे. कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावल्या बद्दल पोलीस उपायुक्त डॉ विवेक पानसरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले आहे.

या गुन्ह्याची उकल पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन, सपोनि भूषण दायमा, पोलीस उप निरीक्षक नितीन मुदगुन, पोलीस हवालदार भोसले, घोलप, मालशेटे, पवार, इत्यादींनी केली आहे.