प्लाझ्मादात्यांवर पुष्पवृष्टी करून लालबागच्या राजाच्या आरोग्योत्सवाची सांगता

मुंबई:  लालबागचा राजा(lalbagcha raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, यावर्षी कोरोना(corona) विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन लोकहितकारी निर्णय घेतला. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आणि सुरक्षेच्या कारणास्तव कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या हेतूने लालबागच्या राजाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता फक्त आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. या आरोग्योत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ३ ऑगस्टला झाले होते. या आरोग्योत्सवातील प्लाझ्मादान शिबिरामध्ये(plazma donation camp) आतापर्यंत एकूण २४६ प्लाझ्मादात्यांनी प्लाझ्मादान केले आहे. तसेच२२ ऑगस्टपासून सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात ३० ऑगस्टपर्यंत एकूण १०,१०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान(blood donation) केले आहे.
जून महिन्यात भारत व चीन सीमेवर चिनीशत्रूशी लढताना गलवान खोऱ्यात भारताचे २२ वीर जवान शहीद झाले. या वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्यचिन्ह व प्रत्येकी रूपये दोन लाख प्रदान करण्यात आले.
कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र व मुंबईतील १११ पोलीस बांधव शहीद झाले.त्यापैकी आतापर्यंत एकूण १०१ शहीद वीर पोलीसांच्या कुटुंबियांना मंडळाच्या वतीने शौर्य चिन्ह व प्रत्येकी रूपये एक लाख देऊन त्यांना सन्मानित  करण्यात आले आहे. अनेक कोरोना योद्ध्यांचा या काळात सन्मान करण्यात आला. तसेच ४ मे ते ४ जून या काळात आरोग्य शिबिरेही घेण्यात आली. दरम्यान ३१ ऑगस्टला २४६ प्लाझ्मादात्यांवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करून प्लाझ्मादान शिबीर आणि संपूर्ण आरोग्योत्सवाची सांगता करण्यात आली.