मराठी आंतरजाल उपक्रमातून भाषिक कौशल्य विकसित होणार

कल्याण : मुंबई मराठी अध्यापक संघाने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी ३३ दिवस आयोजित केलेल्या आंतरजाल उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास होणार असल्याचे मत राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख, मुंबई मराठी अध्यापक संघाच्या अध्यक्षा नंदिनी धाक्रस, कार्यवाह अनिल बोरनारे, उपक्रम प्रमुख मीनल भोळे, सहप्रमुख शलाका काळकर व सुनीता गोळे उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीने प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याचा अंदाज अजूनही बांधता येत नसल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत. शिक्षकांचे अध्यापन प्रभावी व्हावे यासाठी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाने इयत्ता १० वीच्या मराठी कुमारभारतीच्या पुस्तकातील सर्व गद्य, पद्य, उपयोजित लेखन व भाषाभ्यास यावर प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यासाठी धडे व कवितांचे लेखक व कवींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये कवयित्री नीरजा, आसावरी काकडे, ज वि पवार, विरा राठोड, डॉ माधुरी जोशी, लेखक अरविंद जगताप, डॉ महेंद्र कदम यासह अनेक मान्यवर सहभाही झाले होते. कविता व पाठ त्यातील संदर्भ, निर्माण होणारे संस्कार यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मुंबईसह राज्यातील शेकडो शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. तसेच या वेबिनार ला राज्यातील अनेक शिक्षणाधिकारी, मराठी भाषा प्रेमी, संस्थाचालक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

राज्यात पहिल्या टप्प्यात शासकीय शाळांमधील शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण सुरू असून दुसऱ्या टप्प्यात सर्व खाजगी व  अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठी गुगल प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. या गुगल क्लासरूममध्ये एकाचवेळी शिक्षक २५० विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. शिक्षक पीपीटी व युट्युब लिंक शेअर करू शकतील तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्याय देऊन तो स्वाध्याय विद्यार्थी अपलोड करणार असून त्याचे मूल्यमापन शिक्षक घरबसल्या करू शकणार आहे. सुट्टीत शिक्षक जादा तासिकादेखील घेऊ शकणार असून राज्यात विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.