उंभार्णीत उघड्यावर उरकावे लागतात अंत्यसंस्कार

दत्ता बाठे, कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिकेच्या ग्रामीण भागातील उंभार्णी येथे स्मशानभूमी नसल्याने येथे मृतांवर उघड्यावर अंत्यसंस्कार(last ritual) करावे लागत आहेत.पावसाळ्यात मृतदेहावर अग्नी देण्याकरता सरणाच्यावरती कापड, ताडपत्री धरून ठेवावे लागत असल्याने पालिका प्रशासन येथील ग्रामस्थांचा किती काळ अंत पाहणार असल्याचा संतप्त सवाल ग्रामस्थ व्यक्त करीत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये उंभार्णी गाव येत असून कोळी , समाजासहित बौद्ध वस्ती मोठ्या प्रमाणात असून साधारण इतर समाजाचे मिळून दोन ते अडीच हजार लोकवस्ती येथे अस्तित्वात आहे. साधारण ९ गुंठे जागा स्मशानभूमी करिता असून या जागेसंदर्भात वाद असल्याचे समजते. स्माशन भूमीच्या कामाबाबत सर्व्हेच्या कामाची पाहणी तीन वर्षांपूर्वी करण्यात आली असल्याचे समजते. पावसाळ्यात गावातील व्यक्ती मयत झाल्यास मृतावर अग्निसंस्कार करताना भर पावसात ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मोकळ्या जागेवर आणि उघड्यावर मृतदेहावर पावसात अग्निसंस्कार देत असता चितेवरील अग्नी विझू नये याकरिता चक्क कापड पकडून ठेवावे लागत आहे.

आज उंभार्णीत एक मृत झाले होते. मात्र कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मृतावर अग्नीडाग देण्याकरिता ग्रामस्थांनी मृतदेहावर पावसापासून संरक्षण मिळण्याकरिता कापड धरून अंत्यसंस्कार करून घ्यावे लागले. याबाबत बल्याणी प्रभागाच्या स्थानिक नगरसेविका नमिता मयुर पाटील यांंच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,कल्याण डोबिंवली मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असुन जागेचा वादाचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लावुन स्माशनभूमी बांधण्यात यावी. तसेच यासाठी नगरसेवक निधी देण्याबाबत आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.