महाड तालुक्यात पावसामुळे आता दरडी कोसळ्याची भीती

महाड : गेल्या चार दिवसांमध्ये पावसाने महाड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. मागील ७२ तासांमध्ये तब्बल ४२५ मि.मी. तर आतापर्यंत १६७१ मि.मी. एवढा पाऊस नोंदला गेला. गेले दोन दिवस शहरासह तालुक्यात पुराचे पाणी, किरकोळ पडझड, दरडी कोसळणे यामुळे संपूर्ण जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सध्या पावसाचा जोर वाढतच असून आता महापूरापेक्षा संपूर्ण तालुक्यावर दरडींची टांगती तलवार लटकत असून २५ व २६ जुलै २००५ चा हा ट्रेलर आहे, ‘पिक्चर अभी बाकी है’ अशीच काहीशी परिस्थिती सध्या शहरासह संपूर्ण तालुक्यावर बेतली आहे. शासनाची सर्व तऱ्हेची नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मात्र नागरिकांचीही सावधानता त्यासाठी अतिमहत्वाची आहे.

प्रतिवर्षी महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्ती नवीन नाही. मात्र निसर्गाच्या कोपापेक्षा मानवी चुका जास्त जबाबदार राहिल्यामुळे आतापर्यंत संपूर्ण तालुका आणि शहरात १९८४ पासून ते आतापर्यंत महापूर आणि दरडीखाली तब्बल ३५० जनावरांचा बळी गेला आहे. ही आकडेवारी लक्षात घेता शासनापेक्षा प्रत्येकाने किमान अतिवृष्टी काळात स्वत:च्या जबाबदारीचे भान ठेवत सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

गेले दोन दिवस शहराच्या सर्वच भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती. गुरुवारी पुराचे पाणी ओसरले असले तरी अजून सावित्री, गांधारी आणि काळ नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढतच असल्याने सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मागील घटनाक्रम पाहता जिल्हा प्रशासनाने महाडमध्ये इंडियन कोस्टगार्ड, एनडीआरएफच्या दोन टिम तैनात ठेवण्यात आल्या आहेत. महाड तालुक्यांतील ५९ गावे आणि वाड्या या दरड रेषेत येत आहेत. शासनाच्या महसूल विभागाकडून या आधीच अतिवृष्टी काळात बाधित गावांमधील ग्रामस्थांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.