स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये महाड नगर परिषदेची चमकदार कामगिरी

महाड :  स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० चा निकाल आज जाहीर करण्यात आला . महाड नगरपरिषदेने या अभियान स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागामध्ये तेरावा क्रमांक , महाराष्ट्रात बारावा क्रमांक  तर कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून या स्वच्छ अभियानात सलग तिसऱ्या वर्षीही चमकदार कामगिरी बजावून या स्पर्धेतील यशाची परंपरा कायम राखली आहे . महाड नगरपरिषदेच्या राष्ट्रीय पातळीवरील या नेत्रदिपक यशाबद्दल महाड नगरपरिषदेचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे . 

महाडच्या इतिहासाला साजेल अशीच कामगिरी महाड नगरपरिषदेने बजावल्याचा आनंद आपल्याला झाला असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी व्यक्त करीत या यशामध्ये माझे सर्व नगरसेवक ,  न. प.मुख्याधिकारी जीवन पाटील , सर्व कर्मचारी तसेच महाडकर नागरीकांचे महत्वाचे योगदान असल्याचे नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी स्पष्ट केले . 

राष्ट्रीय पातळीवरील पश्चिम विभागात महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या चार राज्यांचा समावेश असून या विभागात २९९ नगरपरिषदांमध्ये  महाड नगरपरिषदेला तेरावा क्रमांक , महाराष्ट्रात १०७ नगर परिषदांमध्ये बारावा क्रमांक तर कोकण विभागात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले असल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली . 

महाड नगरपरिषदेने शहरातील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासह मैला शुद्धीकरण प्रकल्प , ओला आणि सुका कचरा विलगीकरण प्रक्रिया , शहरातील स्वच्छतागृहांचे सुशोभिकरण त्याठिकाणी वीज, पाणी पुरवठा आदी सुसज्ज व्यवस्था , घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था , शहरातील रस्ते , गटारे आणि नाल्यांची सफाई तसेच शहरातील स्वच्छता नियमीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची नगरपरिषदेमार्फत अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत  प्रबोधन केले जात आहे .