महाड उत्पादक संघाच्या डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरचे उद्घाटन

महाड : जगभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असताना महाराष्ट्राने या संकटकाळात खंबीरपणे पावले टाकीत सोयी सुविधा उपलब्ध करुन ही साथ आटोक्यात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाड एमआयडीसीतील के.एस.एफ. कॉलनीत महाड उत्पादक संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या २०० बेडच्या कोव्हीड केअर हेल्थ सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

  याप्रसंगी रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे, उपाध्यक्ष अशोक तलाठी, महाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार, महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जगताप, डॉ. फैसल देशमुख , जयदीप काळे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेले ४ महिने राज्यात दर दिवसागणिक टेस्टींग सेंटर लॅब, कोव्हीड केअर सेंटर उभे केले व साथीला समर्थपणे तोंड दिले. राज्यातील सत्तेत चांगले सहकारी मिळाले म्हणून हे शक्य झाले. त्यामुळे हे श्रेय माझे एकट्याचे नसून जीवापाड मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आहे. कोरोनाचे संकट अद्याप टळले नसून कोरोना आता हात पाय पसरु लागला आहे .मोठ मोठ्या व्हीआयपींकडे असणारे सुरक्षा कवच भेदून तो शिरकाव करू लागला आहे. देशाचे गृहमंत्री, अन्य राज्यातील मुख्यमंत्री, राज्यपाल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे गाफील राहता कामा नये, असे आवाहन करीत गाव पातळीवर कोरोना दक्षता समिती स्थापन करावी अशा सूचना त्यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिल्या.

गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था राज्य सरकार करीत आहे मात्र अनावश्यक प्रवास करणे टाळून वाहतूक व रहदारी कमी करा, असे आवाहन शेवटी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले की, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात आवश्यक त्या उपाययोजना करून रयतेची धुरा मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी समर्थपणे वाहिली. या रोगाबाबतची भिती दूर व्हावी यासाठी औद्योगिक वसाहतींचे योगदान असून महाड उत्पादक संघाने उपलब्ध केलेल्या केअर सेंटरचा फायदा महाड, पोलादपूर, माणगाव तालुक्यातील जनतेला होईल. या केअर सेंटरचा वापर कमीत कमी करण्याची वेळ यावी, अशी सदिच्छा तटकरे यांनी व्यक्त केली. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या संकट काळात आरोग्य सुविधा कमी पडू नये यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. उद्योग विभागाकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जाईल महाडचे ट्रामा केअर सेंटर अॅक्टीव्हेट करणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न व्हावा. अशी मागणी आदिती तटकरेंनी केली.

आमदार भरतशेठ गोगावले यांनी रायगड जिल्ह्यात महाड उत्पादक संघाच्या पुढाकारातून होणारे कोव्हीड केअर सेंटर हे अत्याधुनिक असून या मध्ये ८४ ऑक्सीजन बेड, १० वेंटीलेटर बेड असतील सामाजिक बांधिलकी जपत महाड उत्पादक संघाने उभारलेल्या केअर सेंटरबद्दल त्यांनी कौतुक केले. यावेळी महाड उत्पादक संघाचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांनी कोव्हीड हेल्थ सेंटर बाबतची सविस्तर माहिती दिली.