विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चार जागा, भाजपाला केवळ एकच जागा

राज्याच्या विधान परिषद निवडणुकीत सहा पैकी ४ जागा जिंकत महाविकास आघाडीने भाजपाला धक्का दिला आहे. ६ जागांपैकी केवळ धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा भाजपाच्या पदरात पडली आहे.

मुंबई: राज्याच्या विधान परिषद निवडणुकीत सहा पैकी ४ जागा जिंकत महाविकास आघाडीने(mahavikas aghadi) भाजपाला(bjp) धक्का दिला आहे. ६ जागांपैकी केवळ धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा भाजपाच्या पदरात पडली आहे. अमरिश पटेल या ठिकाणाहून निवडून आले आहेत. इतर चार ठिकाणी पुणे पदवीधर, औरंगाबाद पदवीधर, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपाने दिलेले उमेदवार अपयशी ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष यांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात भाजपाच्या पदरात अपयश पडले आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीसांचे नीकटवर्ती संदीप जोशी आणि पुणे पदवीधर मतदारसंघात संग्राम देशमुख यांचा पराभव झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांचाही पराभव झाला आहे.

निकालांवर नजर
पदवीधर मतदारसंघ
नागपूर- अभिजित वंजारी, काँग्रेस-विजयी, भाजपाच्या संदीप जोशी यांचा पराभव
औरंगाबाद- सतीश चव्हाण, राष्ट्रवादी – विजयी, भाजपाच्या शिरिष बोराळकर यांचा पराभव
पुणे – अरुण लाड, राष्ट्रवादी- विजयी, भाजपाच्या संग्राम देशमुखांचा पराभव

शिक्षक मतदारसंघ
पुणे- जयंत आसगावरकर, काँग्रेस -विजयी, भाजपा समर्थित अपक्ष जितेंद्र पवार पराभूत
अमरावती- अपक्ष विकरण सरनाईक- विजयी, शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे आणि भाजपाच्या नितीन धांडेंचा पराभव
स्थानिक स्वराज्य संस्था
धुळे- भाजपाच्या अमरिश पटेल यांचा विजय, काँग्रेसच्या अभिजीत पाटील यांचा पराभव

महाविकास आघाडीची स्थिती भक्कम
चार जागांच्या विजयामुळे विधान परिषदेत आघाडीची स्थिती चांगली झाली आहे. ७८ सदस्यसंस्खा असलेल्या विधान परिषदेत आता आघाडीचे ३८ सदस्य झाले आहेत. तर सदनात भाजपाचे २३ सदस्य आहेत. याव्यतिरिक्त १२ राज्यपाल नामनिरदेशित नावांची यादी सरकारने राज्यपालांकडे पाठवली आहे, त्यावरचा निर्णय अद्याप झालेला नाही.