महावितरण कार्यालयाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कल्याण : महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभाग आणि कल्याण परिमंडळ कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके (भाप्रसे) यांच्या हस्ते प्रादेशिक विभाग कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. तर कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहव्यवस्थापकीय संचालक बोडके यांच्या हस्ते प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झालेल्या या भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, कोरोना संसर्गाचे सावट व मान्सूनच्या पावसाचा सामना करत वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कामगिरी अतुलनीय असल्याचे प्रतिपादन बोडके यांनी केले. तर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या हस्ते ३० लाख रुपये सानुग्रह सहाय्य मंजुरीचे आदेश देण्यात आले.

कल्याण परिमंडलात गतवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या ५१ तांत्रिक कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता अग्रवाल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी कामगार दिनानिमित्त आयोजित केला जाणारा उत्कृष्ट कामगार पुरस्कार वितरण सोहळा लॉकडाऊनमुळे यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घेण्यात आला. याशिवाय कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात नियमित कामांसह गरजूना जगण्याचे बळ देणारे सामाजिक काम करणाऱ्या कर्मचारी व संघटनांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच स्वच्छतेची काळजी घेणारे सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

महाव्यवस्थापक अनिल बराटे, सुनील पाठक, उप व्यवस्थापक योगेश खैरनार, अधीक्षक अभियंता सुनील काकडे व अनिल घोगरे, सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यांच्यासह दोन्ही कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.