death

भिवंडी: उत्तरप्रदेशमधील कर्नलगंज ,फुलपूर या मूळ गावातील घर व शेतजमीन प्रॉपर्टीच्या वादातून मामा मंडळीनी एक भाचा व भाऊ,मेहुणे आदींना सोबत घेऊन प्रॉपर्टीमध्ये अडथळा ठरणाऱ्या भाच्याला कायमचा संपवण्याच्या इराद्याने बंदुकीच्या चार गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुलजार नगर येथील याकूब शेठच्या बिल्डिंग समोर गुरुवारी रात्री घडली होती . या घटनेतील जखमी झालेल्या अब्दुल सत्तार मोहम्मद इब्राहिम मंसुरी (६५रा. गुलजार नगर ) यांच्यावर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर रविवारी उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला आहे.

अब्दुल सत्तार मंसुरी यांचे उत्तर प्रदेशमधील मूळ गावातील आईच्या हिश्यावरून मामांसोबत घर आणि जमिनीच्या प्रॉपर्टीवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून अब्दुल याचे मामा सिराज उर्फ सोनू मुस्तफा मंसुरी,वकील मंसुरी, शकील मंसुरी, इस्तीयाक मंसुरी यांनी रचून भाचा अब्दुल रज्जक मोहम्मद इब्राहिम मंसुरी,मेहुणे इसरार मोमीन, मुमताज अन्सारी आदींच्या साथीने अब्दुल मंसुरी हे त्यांच्या मेडिकल दुकानातून रात्री घरी जात असताना त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यावर बंदुकीतून चार गोळ्या झाडून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या गोळीबाराच्या हल्ल्यात अब्दुल मंसुरी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी ठाण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापूर्वीच या घटनेतील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील दोन आरोपींना अब्दुल रजाक मोहम्मद इब्राहिम मंसुरी व इसरार अहमद यार मोहम्मद मोमीन या दोन मुख्य हल्लेखोरांना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य पाच हल्लेखोरांनादेखील शांतीनगर पोलीसांनी अटक केली आहे.