मुंबई- गोवा महामार्गावर खड्डेच खड्डे

सुतारवाडी:  मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली असुन या खड्डयांमुळे प्रवाश्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते नागोठणे दरम्यान रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे  वाट काढताना प्रवासी वर्गाची पुर्णपणे दमछाक‌ होत आहे. पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून चाकरमानी मुंबईकडे निघाले असता या महामार्गावर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे यातून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडीही निर्माण होत असल्याचे संकेत मिळत असून कामानिमित्ताने घराबाहेर पडलेला माणूस वेळेवर पोहचू शकत नाही,अशी गंभीर अवस्था या मार्गाची झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणे आवश्यक होतेे. यामुळे पत्रकारांनी रस्ता रोको ही केला. यानंतर पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाच्या कामाला मंजूरी मिळाली व या महामार्गाचे काम सुरू केले.मात्र ऐंशी किलोमीटरच्या या कामाला दहा वर्षे पुर्ण झाली तरी या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही.त्यात अनेक पक्षांच्या सत्ता आल्या गेल्या पुन्हा सत्ता आली अनेक मंत्र्यांनी पाहणी देखील केली अनेक ठेकेदारांनी कामेही केली.परंतुु या रस्त्याचे काम पूर्ण होईना?  रस्ते वाहतुक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या महामार्गाची पाहणी करुन मार्च२०१९ पर्यंत या चौपदरीकरणाचे काम पुर्ण होईल असे सांगितले होते.परंतुु अद्याप हे काम पुर्ण झाले नाही.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम वर्षाला फक्त १० कि.मी.असे केले असते तरी या महामार्गाचे काम अद्याप पुर्ण झाले असते. परंतुु नियोजन शुन्य कारभारामुळे या महामार्गाचे काम कमी आणि दुरुस्ती फार अशी व्यथा या महामार्गाची झाली आहे. हे काम केव्हा पुर्ण होईल याची खात्री देता येत नाही. यामुळे प्रवाशांच्या जिवाला दिवसेंदिवस अपघातांचा धोका निर्माण होत असुन यापासुन लवकरच सुटका होण्यासाठी या महामार्गाचे काम यावर्षी तरी पुर्ण करावे,अशी मागणी केली जात आहे.