तांबडी प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, रोह्यात समन्वयकांची बैठक

रोहा: तांबडी घटनेतील अत्याचार व खून प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा आज प्रचंड आक्रमक झाला. राज्याच्या बहुतेक जिल्ह्यातील समन्वयकांनी रोहा येथे महत्वपूर्ण बैठक घेत पुढील भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप का भेट दिली नाही, असे म्हणत नेत्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई झाल्यास, दुर्लक्ष झाल्यास थेट मंत्रालयावर मराठा क्रांती मोर्चाचा भव्यदिव्य मोर्चा निघेल. याची शासनाने दखल घ्यावी, असा इशारा राज्याचे समन्वयक संभाजी पाटिल यांनी यावेळी दिला.

राज्याच्या अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी तांबडी गावातील पीडितेच्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. या बैठकीत अनेकांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. अल्पवयीन पीडितेच्या अत्याचार प्रकरणात नक्की आरोपी किती, पोलीस प्रशासनाकडून अजून काही कागदपत्रे दिली जात नाहीत, तांबडीची क्रूर घटना ठरवून असावी असे म्हणत १२० ब अन्वये चौकशी करण्यात यावी. प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा नेवू, मराठा समाजाची नव्याने ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, अशा भावना स्थानिक पदाधिकारी व समन्वयकांनी व्यक्त केल्या. दरम्यान, राज्यात निघणाऱ्या विविध मागण्यांसाठीच्या मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात तांबडी येथील पीडित लहान भगिनीला श्रद्धांजली वाहून होते का ? याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून झाल्याची घटना घडली आणि सबंध राज्यात खळबळ उडाली. त्या घटनेवर सर्व समाज मुख्यतः मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करून संबंधित प्रकरण फास्ट ट्रकवर चालवावे, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, सरकारी वकील नेमून जलद करावे अशी मागणी सर्वच स्तरातून झाली. तांबडी प्रकरणावर मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला. अनेक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समनवयकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर सोमवारी अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, सांगली, लातूर, मुंबई, नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वकांनी रोह्यात महत्वपूर्ण बैठक घेतली. त्या बैठकीला राज्य समनवयक संभाजी पाटील, रामभाऊ गायकवाड, महेश डोंगरे, सुनिल नागणे, विनोद साबळे, स्थानिक अध्यक्ष आप्पा देशमुख, नितीन परब, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा अंबरे, राज्य समन्वयक हेमंत देशमुख, समीर शेडगे, सुहास येरुणकर, अनंत देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते. रायगडमधील तांबडीची घटना भयानक आहे. भगिनीला न्याय मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना भेटणे, निवेदन देणे फार उपयोगाचे नाही, थेट मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा नगरचे समन्वयक संभाजी पाटील यांनी दिला. अत्याचारात अजून कोणी मास्टरमाइंड आहे का, तसा संशय येत आहे, तपासावर आम्ही समाधानी नाहीत. तपास योग्य दिशेने झाले पाहिजे. तसेच हे चोरीचे प्रकरण नाही. बलात्कार हत्या केल्याचे आहे, मराठा विरुद्ध आदिवासी वाद वाढवू नका असा इशारा रायगडचे समन्वयक विनोद साबळे यांनी आदिवासी नेत्यांना दिला.