मराठी भूमिपुत्रामुळे अंदमान व निकोबार बेटांना दूरसंचाराच्या जलद सेवा सुरु

नवी दिल्ली :  भारताच्या पूर्व भागाला असणाऱ्या अंदमान व निकोबार बेटांनाही उर्वरित देशाप्रमाणे जलद संचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चेन्नई ते अंदमान व निकोबार दरम्यान २३०० किलो मीटर लांबीची सबमरीन ऑप्टीकल फायबर केबल समुद्रात टाकण्यात आली आहे.  सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.  हा प्रकल्प युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) च्या देखरेखीत पूर्ण करण्यात आला आहे. या युएसओएफचे संचालक विलास बुरडे आहेत. बुरडे महाराष्ट्राचे असून त्यांनी मर्यादित वेळेत या प्रकल्पाची जबाबदारी पार पाडली.

या भागांना मिळणार जलद सेवा 

सबमरीन केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर आणि पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगत या आठ द्वीपांना जोडली जाणार आहे. या जोडणीमुळे देशातील इतर भागांप्रमाणेच अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल आणि लँडलाईन दूरध्वनी सेवा जलद आणि अधिक विश्वासार्ह होणार आहे.

फायदा काय ? 

सुधारित टेलिकॉम आणि ब्रॉडबँड जोडणीमुळे बेटांवर पर्यटन व्यवसायाला अधिक प्रोत्साहन मिळेल, रोजगार वाढतील, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि स्थानिक राहणीमानाचा दर्जा सुधारेल.  चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे टेलिमेडिसीन आणि टेली-एज्युकेशन या ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील तर शैक्षणिक संस्था विस्तारित बँडविडथचा वापर ई-लर्निंग आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी करतील.