मटका किंग जिग्नेश ठक्कर याची धर्मेश, जयपालने केली हत्या

कल्याण : खंडणी, जबरी चोरी असे ५ गुन्हे दाखल असलेल्या कल्याणमधील मटका किंग जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. जुन्या भांडणाच्या रागातून धर्मेश उर्फ ननु शहा, जयपाल उर्फ जापान यांनी ही हत्या केल्याची माहिती महत्मा फुले चौक पोलिसांनी दिली.

जिग्नेश ठक्करचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात मटका आणि पत्त्यांचे क्लब असण्यासह तो क्रिकेट मॅचवरही सट्टा घेत होता. जिग्नेशचे कल्याण स्टेशनजवळ, सुयश प्लाझा, तळमजला येथील पार्कींगच्या जागेत तृप्ती स्टोन क्रशरचे कार्यालय असून ऑफिसजवळ मोबाईल फोनवर बोलत उभा असताना आरोपी धर्मेश उर्फ ननु नितिन शहा, जयपाल उर्फ जापान व इतर २ अनोळखी इसम असे तेथे येवुन आरोपी धर्मेश उर्फ ननु शहा, जयपाल उर्फ जापान यांनी त्यांच्याकडील बंदुकीतून जिग्नेशच्या छातीवर, पोटावर ५ राऊंड फायर केले.

यावेळी या ठिकाणी असलेले साक्षीदार हे जिग्नेशकडे जात असताना आरोपींनी “कोई बीच मे आया तो ठोक देंगे” अशी जीवे ठार मारण्याची धमकी देवुन तेथुन निघुन गेले. या साक्षीदारांनी यांनी जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याला जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषित केले. यातील मृत जिग्नेश ठक्कर तसेच आरोपी धर्मेश उर्फ ननु शहा हे लहानपणीचे मित्र असुन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. आरोपी धर्मेश उर्फ नन्नु नितिन शहा याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे एकुण १५ ते २० गुन्हे दाखल असुन मयत जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया याच्याविरुद्ध खंडणी, जबरी चोरी असे एकुण ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी धर्मेश शहा तसेच मृत जिग्नेश ठक्कर हे एकाच खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी आहेत.

बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंकरराव चौक येथे २९ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास आरोपी धर्मेश उर्फ ननु नितिन शहा याचा मित्र चेतन पटेल व मृत जिग्नेश ठक्कर उर्फ मुनिया यांच्यात शिवीगाळ, हाणामारीचा प्रकार घडला होता. त्याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात चेतन पटेल याच्या तक्रारीवरुन जिग्नेश ठक्कर, सऊद अक्रम शेख, मनिष शामजी चव्हाण यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा तसेच जिग्नेश ठक्कर याच्या  तक्रारीवरुन चेतन पटेल याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मृत जिग्नेशविषयी आरोपी धर्मेश उर्फ नन्नु शहा याच्या मनात राग होता. मयत व आरोपी धर्मेश उर्फ ननु शहा यांचेतील पुर्वीचा आर्थिक वाद तसेच तात्कालीन कारणावरुन ही हत्या झाली असून याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करत या आरोपींच्या शोधासाठी ५ पोलीस पथके तयार केले असून त्यांना विविध ठिकाणी रवाना केले असल्याची माहिती महात्माफुले चौक पोलिसांनी दिली.