मंदिरं उघडण्यावरुन एमआयएम आणि शिवसेनेत खडाजंगी

औरंगाबाद येथील खडकेश्वर मंदिर उघडण्यावरुन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.राज्य सरकारनं १ सप्टेंबरपासून मंदिरं उघडावी आणि २ तारखेला मशिदी उघडू असं अल्टिमेटम इम्तियाझ जलील यांनी राज्य सरकारला दिलं होतं.त्यानुसार आज इम्तियाझ जलील यांनी मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.या पार्श्वभूमीवर “मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. मंदिरं उघडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत,” असं खैरे म्हणाले होते. यावर जलील यांनी “हिंदू धर्माचा ठेका कोणा एकाकडे नाही आणि हिंदू मंदिरं तसंच धर्माला कोणीही आपली मक्तेदारी समजू नये,” असं प्रत्युत्तर खैरे यांना दिले.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं उघडण्याची सातत्यानं मागणी केली जात आहे.याच पार्श्वभूमीवर जलील यांनी ट्विट करत. राज्य सरकारनं १ सप्टेंबरपासून मंदिरं उघडावी आणि २ तारखेला मशिदी उघडू असं अल्टिमेटम दिले होते.औरंगाबाद येथील खडकेश्वर मंदिर येथे आंदोलन करणार होते मात्र आज गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतले.

जलील यांना राजकारण करायचं आहे : खैरे

मंदिरं उघडा हे सांगणारे जलील कोण आहेत?मंदिर उघडण्यावरून राजकारण सुरु असून जलील यांना राजकारण करायचं आहे. शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका सोडली असल्याचं त्यांना दाखवायचं असून शिवसेनेला बदनाम करण्याचा त्यांचा डाव असल्याचे खैरे म्हणाले.