मिशन झिरो अंतर्गत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करणे हेच उद्दीष्ट – एकनाथ शिंदे

कल्याण : मिशन झिरो अंतर्गत कोविडचा प्रार्दुभाव कमी करणे हेच प्रमुख उद्दीष्ट असल्याचे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महापालिका क्षेत्रात जास्तीत जास्त संशयित कोरोना रुग्णांच्या अॅन्टीजेन टेस्ट करुन पॉझिटीव्ह रूग्ण शोधण्यासाठी जनजागृती करणेकामी महापालिका क्षेत्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिका , भारतीय जैन संघटना, देश अपनाये व एम.सी.एच.आय. क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित रित्या राबविल्या जाणाऱ्या मिशन झिरो या मोहिमेचा प्रारंभ कल्याण स्पोटर्स क्लब येथे झाला त्यावेळी शिंदे बोलत होते.

लोकांच्या सहभागानेच हे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. लवकर निदान महत्वाचे असून त्यामुळे रुग्ण वाचतो, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा सहभागही महत्वाचा आहे. काम करणाऱ्या लोकांवर, लोक आरोप करतात हे दुर्दैव आहे, पेशंटसाठी संवाद साधणे महत्वाचे आहे. ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या चतु:सुत्रीचा वापर करावा, असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला.

आय.एम.ए. कल्याण व डोंबिवलीच्या डॉक्टरांनी प्रारंभापासूनच मानधन न घेता महापालिकेला मदत केली. असा उल्लेख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्‍या भाषणात केला. महामारीमध्ये सु‍विधा असणे आवश्यक आहे, म्हणूनच अतिरिक्त बेड सुविधा असणे गरजेचं आहे, असे ते यावेळी म्हणाले. मिशन झिरो अंतर्गत जनजागृतीसाठी
५ प्रचाररथ आणि ५ मिडी बसेसना हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

हे प्रचार रथ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेञात सर्वञ संचार करणार असून, पालिका क्षेत्रातील विविध प्रभांगांमधील सहकारी गृहनिर्माण संस्थां, इमारती, चाळी व झोपडपट्टया या सर्व ठिकाणी फिरून , संशयित रूग्ण तसेच ६० वर्षावरील व्यक्ती त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, इत्यादी दुर्धर व्याधींनी ग्रस्त नागरिकांना त्याबाबत माहिती देवून व त्यांच्यामध्ये जनजागृती करून त्यांना महानगरपालिकेने निर्धारीत केलेल्या अॅन्टीजेन टेस्ट सेंटरमध्ये टेस्टिंगसाठी पाठविण्याचे काम करणार आहेत. त्याचप्रमाणे मिडी बसेस सर्वत्र फिरुन संशयित रुग्णांची अॅन्टीजेन टेस्ट करण्याचे काम पार पाडणार आहेत.