आमदार अनिकेत तटकरेंची श्रीवर्धनमध्ये आढावा बैठक

श्रीवर्धन:  निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे व आमदार अनिकेत तटकरेंनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून जुने निकष बदलून नुकसानग्रस्तांसाठी आर्थिक मदत वाढवून घेतली. नुकसान भरपाई पंचनामे दाखल झालेल्यांना तात्काळ मिळावी यासाठी प्रयत्न केल्याने बहुतांशी लाभार्थ्यांना रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली. तांत्रिक अडचणींमुळे काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. या मदतीबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी व कोरोना रोगाच्या पार्शवभूमीवर आमदार अनिकेत तटकरे यांनी प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे आढावा बैठक घेतली .

बैठकीत जनतेच्या तक्रारी ऐकून घेत अधिकाऱ्यांना सूचना देत कामांचा वेग वाढवण्याच्या सूचना तटकरेंनी दिल्या. पंचनामे दाखल होऊन संबधितांच्या खात्यात रक्कम का जमा होत नाही याची चौकशी करण्यात आली. पंचनाम्यात आधारकार्ड नावात साधर्म्य, चुकीचे नाव, बँक खाते नंबर चुकीचे अशा तांत्रिक चुका येत असल्याने उर्वरित लाभार्थ्यांना रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात आले. तांत्रिक चुका लवकरात लवकर दुरुस्त करून उर्वरित लाभार्थ्यांना रक्कम देण्याच्या सूचना यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोरोनाच्या पार्शवभूमीवर केलेल्या उपाययोजना तसेच सध्याची स्थिती याबाबत माहिती घेऊन उपजिल्हा रुग्णालयाला पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या आमदार फंडातून रुग्णवाहिका देणार असल्याचे अनिकेत तटकरेंनी जाहीर केले . गणेशोत्सवासाठी येणारे चाकरमानी तसेच रस्ते, पाणी, वीज याबाबत प्रशासनाने तयारी कशा प्रकारे केली आहे, याची माहिती घेऊन संबंधितांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देता शासकीय नियमानुसार जनतेला गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा यासाठी तटकरेंनी सूचना दिल्या.

आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मधुकर ढवळे, नगराध्यक्ष जितेंद्र सायनाक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणगणे, गटविकास आधिकारी सिंणारे, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजण तसेच विविध खात्याचे अधिकारी उपिस्थत होते .