पुस्तकांची जास्त किमतीने विक्री करणाऱ्या पेणमधील शाळेला मनसेचा दणका

पेण: मनसेचे विद्यार्थी सेना रायगड जिल्हा सचिव रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेतर्फे कारमेल हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना या शाळेमार्फत अगर नियुक्त एजन्सीमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकाची किंमत छापील किमतीपेक्षा जास्त घेत असल्याबाबत निवेदन देऊन तंबी देण्यात आली आहे.

कारमेल हायस्कूलमध्ये पाठ्यपुस्तकाच्या किमतीपेक्षा जास्त पैसै घेत असल्याचा अनेक तक्रारी पालकांकडून आल्या असल्याने रुपेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कारमेल हायस्कूलच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली. त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही वस्तूची विक्री ही छापील किमतीपेक्षा जास्त किंमतीला करणे कायद्याने गुन्हा आहे असे असताना शाळेमार्फत शाळेच्या आवारात राजरोसपणे शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाची विक्री छापील किमतीवर जास्त किमतीचा स्टिकर लावून पालक वर्गाची लूट केली जात आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा तसेच आतापर्यंत शाळेमार्फत अगर शाळेच्या आवारात नियुक्त एजन्सीमार्फत ज्या विद्यार्थ्यांना जास्त किमतीने पुस्तकांची विक्री केली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना छापील किंमत व विक्री किमतीच्या फरकाची रक्कम त्वरित परत करावी अन्यथा शाळेविरुद्ध मनसे स्टाईल आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा दिला.

यावेळी मुख्याध्यापिकेने या प्रकरणाबाबत येत्या काही दिवसांमध्ये आम्ही आपणास कळवू असे सांगितले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश पोरे, संदीप म्हात्रे पेण तालुका उपाध्यक्ष, अमोल म्हात्रे मनविसे तालुका अध्यक्ष, रुपेश पाटील कळवे, मधुकर पाटील आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.