निर्मळमधील पाणी प्रश्नाला मनसेने दिला पूर्णविराम

वसई : गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या नालासोपारा पश्चिमेकडील निर्मळ गावातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाला अखेर मनसेने पूर्णविराम दिला असून पाण्यासाठी होणारी वणवण थांबविली आहे.

पाण्याची समस्या लक्षात घेऊन त्रस्त नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समाजसेविका विजयता सुर्वे- दुदवडकर यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वसई विरार शहर महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र गेली अनेक महिने प्रशासन हा विषय गांभीर्याने घेत नसल्याने शेवटी आक्रमक पवित्रा घेत मनसेचे नालासोपारा शहरसचिव राज नागरे यांच्यासह प्रभाग समिती ‘ई’ चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांना त्वरित नळ जोडणी करून द्या, ही जोरदार मागणी लावून धरीत आंदोलनाचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन पाणी पुरवठा विभागातील अभियंता व इतर अधिकारी यांना आदेश देऊन संबंधित ठिकाणाची पाहणी करण्यास सांगून अहवाल सादर केल्यानंतर निर्मळ गावात एकूण १८ नागरिकांना नळ कनेक्शनची जोडणी करून देण्यात आली.

सामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या मनसेच्या मागणीला अखेर यश आले. नागरिकानी अथक परिश्रम घेणाऱ्या मनसेच्या सौ.विजयता सुर्वे- दुदवडकर,राज नागरे,संजय मेहरा,दिलीप नवाळे व आनंद मौर्या या पदाधिकाऱ्यांचे व महापालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले.