महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल मनसे आमदाराने आयुक्तांना इंजेक्शन दिले भेट

कल्याण/डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णासाठी मागवलेले रेमेडिसिव्हीर इंजेक्शन रुग्णाच्या घरीच पडून राहिल्याचा प्रकार डोंबिवलीत समोर आला. हे इंजेक्शन मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आयुक्तांना भेट दिले. मनसे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचाही राजू पाटील यांनी निषेध केला. राजू पाटील हे मनसे शिष्टमंडळासह कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात आले होते.

डोंबिवलीच्या पाटीदार भवनातील पालिकेच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णासाठी ३ ऑगस्ट रोजी रेमेडिसिव्हीर हे इंजेक्शन आणण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी हे इंजेक्शन रुग्णाच्या नातेवाईकाला उपलब्ध करून दिले. मात्र पाटीदार भवनात इंजेक्शन ठेवायला फ्रीज नसल्याने डॉक्टरांनी हे इंजेक्शन घरीच ठेवायला रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. यानंतर आता ११ दिवसांनी या रुग्णाला डिस्चार्ज देण्याची वेळ आली, तरी रुग्णाला इंजेक्शन मात्र देण्यात आलेले नसल्याने हे इंजेक्शन रुग्णाच्या घरीच पडून होते.

या भोंगळ कारभाराचा जाब विचारण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी पाटील यांनी आयुक्तांना रुग्णाच्या घरी पडून असलेले रेमेडिसिव्हीर इंजेक्शन भेट म्हणून दिले. तसेच डोंबिवली जिमखान्यात धूळ खात पडून असलेल्या व्हेंटिलेटर्सची पोलखोल केल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचाही राजू पाटील यांनी निषेध केला. आयुक्तांनी हा गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे, पण नाही घेतला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. मात्र हा सगळा कारभार चुकीचा असल्याची टीका यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. यावेळी मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम, गटनेते मंदार हळबे, माजी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मनोज घरत उपस्थित होते.