भिवंडीत विसर्जनासाठी होणार मोबाईल ऍपचा वापर

भिवंडी: सध्या सुरू असलेल्या कोरोना संक्रमण काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने नियम, अटी लागू केल्या असतानाच भिवंडी महानगरपालिका गणेशोत्सव काळात सर्व यंत्रणेसह सज्ज असून विसर्जन घाटावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा मोबाईल ऍपचा वापर केला जाणार असून गणेशभक्तांना ऑनलाईन दिलेल्या वेळेतच विसर्जन करता येणार आहे, अशी माहिती महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी दिली आहे. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत भिवंडी पोलीस विभाग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांची संयुक्त बैठक नुकतीच पालिकेत पार पडली. त्यावेळी महापौर प्रतिभा विलास पाटील व आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी जनतेस आवाहन केले. यावेळी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे , स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे , सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शहरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत  शासनाच्या प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरीकांनी करून येणार गणेशोत्सव साजरा करावा,असे आवाहन करीत घरगुती गणपती मूर्तीची उंची २ फूटापर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फूट उंच मुर्तीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांना काढता येणार नसून दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स ॲाक्सीमीटरच्या साहाय्याने तपासणी बंधनकारक राहणार असल्याचे सांगत मंडपातील प्रत्येकाची नोंद ठेवण्याचे बंधन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घातले असल्याचे महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी स्पष्ट केले .

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे भिवंडी  महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी आपली मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे. यामध्ये घरगुती गणपती साठी श्रीगणेश मुर्तीचे आगमन व विसर्जन मिरवणुकीच्या स्वरूपाचे नसावे, आगमनाच्या आणि विसर्जनाच्यावेळी जास्तीत जास्त पाच लोक असावेत, गणपतीची सजावट पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी असावी, राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे प्लास्टीक आणि थर्माकोलचा वापर करू नये, गणपतीच्या दर्शनासाठी, तीर्थप्रसाद व महाप्रसादासाठी गृहभेटी टाळाव्यात, विसर्जनस्थळी नागरिकांना कमीत कमी वेळ थांबता यावे यासाठी विसर्जन समयी निघताना गणेशभक्तांनी घरीच श्रीगणेशाची आरती करून घ्यावी . शक्यतो घराच्या आवारात, इमारतीच्या परिसरात विसर्जन करावे . विसर्जन घाटावर गणपतीचे विसर्जन करण्यात येत असताना महत्वपूर्ण सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

 मोठ्या गृहसंकुलाच्या ठिकाणी त्यांच्या संकुलातील गणेश मुर्तीचे विसर्जन सिंटेक्सच्या मोठ्या टाकीमध्ये करण्याची दक्षता घेण्याबरोबरच निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात यावे असे स्पष्ट करून भिवंडी महानगरपालिकेने नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पुजावी व घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करावे अथवा पीओपी गणपती मूर्तीबाबत विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावली तयार करताना महापालिकेने कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर सार्जनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे असे आवाहन केले आहे. मात्र तरीही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला तर तो कमीत कमी दिवस साजरा करावा, गणपतीची मूर्ती चार फुटाच्या मर्यादेत असावी, मंडळांनी मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य असून मंडपामध्ये थर्मल स्कॅनर, पल्स ॲाक्सीमीटरच्या माध्यमातून भाविकांची तपासणी करावी, त्यांची नोंद ठेवावी, मंडपामध्ये एकाचवेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी तसेच मंडपामध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक राहणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेश दर्शनासाठी शक्यतो केबल नेटवर्क, ॲानलाईन सुविधा अथवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी असे स्पष्ट करून मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रमाना गर्दी टाळण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारच्या जाहिराती प्रदर्शित न करता आरोग्यविषयक तसेच सामाजिक संदेश असणाऱ्या जाहिराती प्रदर्शित करण्यात याव्यात असेही महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी स्पष्ट केले आहे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची उंचीही १२ फुटांपेक्षा जास्त असणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच त्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्याची जबाबदारी मंडळांची राहिल. त्याचबरोबर मंडपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंद करणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बंधनकारक राहणार आहे,असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हॅाटस्पॅाट आणि प्रतिबंधित क्षेत्रांमधील गणपती मूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर विसर्जनास परवानगी देण्यात येणार नसून कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवामध्ये कोरोनाची संसर्ग होणार नाही यासाठी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.