कृषीपंप वीज जोडणी धोरणाला चांगला प्रतिसाद,५.८२ लाख शेतकर्‍यांनी भरली ५११ कोटी रुपयांची थकबाकी

नवीन कृषीपंप वीज जोडणी(electricity supply to pumps) धोरणाला राज्यातील शेतकरी(farmers) सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत ५.८२ लाख शेतकर्‍यांनी थकीत कृषीपंप वीजबिलापोटी(pending electricity bill paid by farmers) ५११ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम भरली आहे.

  मुंबई: नवीन कृषीपंप वीज जोडणी(electricity supply) धोरणाला राज्यातील शेतकरी(farmers) सकारात्मक प्रतिसाद देत असून आतापर्यंत ५.८२ लाख शेतकर्‍यांनी थकीत कृषीपंप वीजबिलापोटी(pending electricity bill ५११ कोटी २६ लाख रुपयांची रक्कम भरली आहे. प्रलंबित वीजजोड प्रकरणी तात्काळ कार्यवाही आणि थकीत वीजबिल वसुलीसाठी भरघोस सवलत देण्याच्या या नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाची आखणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून करण्यात आली आहे.

  राज्यात कृषिपंपांवर ४५ हजार ७८९ कोटी रुपयांची थकबाकी

  कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणमार्फत महाकृषी ऊर्जा अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या ५११ कोटी २६ लाख रकमेवर २५६ कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. एकूण ५ लाख ८२ हजार ११४ शेतकर्‍यांनी ही थकबाकी भरली आहे. यात पुणे विभागात सर्वाधिक थकबाकी भरण्यात आली आहे. राज्यातील ४४ लाख ४४ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ७८९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणानुसार विलंब आकार आणि व्याजातील एकूण सूट १५ हजार ९३ कोटी रुपये इतकी असून सुधारित होणारी थकबाकी ३० हजार ६९६ कोटी रुपये होते. पहिल्या वर्षी भरल्यास सुधारित मूळ थकबाकीपैकी अर्धी म्हणजेच सुमारे १५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम माफ होणार आहे. अशा प्रकारे एकूण ३० हजार कोटी रुपयापेक्षा अधिकची भरीव सूट थकबाकीदार कृषिपंप धारकांना मिळणार आहे.

  थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार

  या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद सतत वाढत असून थकबाकी भरणार्‍या शेतकर्‍यांचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आभार मानले आहेत. तसेच सर्व थकबाकीदार शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

  या योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार असून महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे. हे लाभ देऊन सुधारित करण्यात आलेल्या सप्टेंबर, २०२०च्या देयकातील सुधारित मूळ थकबाकीवर पहिल्या वर्षी भरल्यास ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. अशाप्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणार्‍या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

  दोन वर्षात थकबाकी भरणार्‍या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के तर तीन वर्षात थकबाकी भरणार्‍या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे तुलनेत पहिल्याच वर्षी थकबाकी भरल्यास मोठा लाभ होणार असून कृषिपंप ग्राहक थकबाकीमुक्त होण्यास मदत होईल, असे नितीन राऊत यांनी सांगितले आहे.