BJPs orange flag is fake Sanjay Rauts harsh criticism

केंद्र सरकारने कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, हेच खरे कारण असेल तर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक(bihar election) कशी झाली? असा प्रश्न संजय राऊत(sanjay raut) यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द(parliament winter session cancelled) करण्यात आले आहे. यावरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यातच हिवाळी अधिवेशन रद्द करण्याच्या मुद्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्र सरकार आणि भाजपावर टीकेची तोफ डागली आहे. केंद्र सरकारने कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र, हेच खरे कारण असेल तर बिहारमध्ये विधानसभा निवडणूक(bihar election) कशी झाली? असा प्रश्न संजय राऊत(sanjay raut) यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, कोरोना हे जर संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेण्याचे खरे कारण असेल. तर, बिहारची निवडणूक कशी झाली. बिहारमध्ये लाखोच्या सभा कशा झाल्या, बंगालमध्येही निवडणूकांसाठी जोरदार जमवाजमव सुरू आहे. एकीकडे राज्यातही मंदिरे उघडा, शाळा उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, अशी मागणी भाजपाकडून केली जात आहे. मग भाजपच्याच सरकारने हिवाळी अधिवेशन का रद्द केले? भाजपा सोयीनुसार, सवडीनुसार लोकशाही, स्वातंत्र, आणीबाणीच्या व्याख्या ठरवत आहे. राज्यात भाजपाचे एक धोरण असते, तर देशात वेगळे असते. कोरोनाच्या नावाखाली संसदेचे हिवाळी अधिवेशन घ्यायचे नाही हे ढोंग आहे.

केंद्राचा पळ काढण्याचा प्रयत्न
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात प्रल्हाद जोशी यांनी यंदाचे हिवाळी अधिवेशन होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एकीकडे, दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटनेचे नेते आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेच्या फैरी निष्फळ ठरल्या आहे. अशातच, विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली जात होती. मात्र, सरकारने हिवाळी अधिवेशनच रद्द केले आहे. यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यापासून पळ काढत असल्याचे आणि विरोधकांच्या संतापापासून वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

याबाबत राऊत म्हणाले, कोरोना काळात राज्यात मंदिरे उघडण्याची भाषा करणाऱ्या भाजपने संसदेचे हिवाळी अधिवेशन का रद्द केले, याचे खरे उत्तर द्यावे. राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी भाजपाने आकांडतांडव केला. राज्य सरकारने योग्यवेळी राज्यातील मंदिरे सुरू केली, मात्र भाजपा सरकारने लोकशाहीचे मंदिर का बंद केले? असा खोचक प्रश्नही त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पावर आमचेही लक्ष
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या जागेवरून सध्या राजकारण सुरू आहे. यावर हिवाळी अधिवेशनातही संघर्ष दिसून आला. मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पात कुणी हा असा मिठाचा खडा टाकणार असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड झाल्याने केंद्र सरकारवर आकाश कोसळणार नाही. मिठाचे आयुक्त हे केंद्राचे नोकर आहेत. त्यामुळे कदाचित मीठ आयुक्तांना महाराष्ट्राचे मीठ अळणी लागत असेल. मात्र, कोणी कितीही उपद्व्याप करा. बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजूरची मेट्रो कारशेड पुढे जाईल. बुलेट ट्रेन प्रकल्पावर आमचेही लक्ष आहे, असा इशारा शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून भाजपला दिला आहे.