खड्ड्यांच्या मुद्दयावरून खासदार शिंदे आणि आमदार पाटील आमनेसामने

कल्याण : कल्याण शीळ रोडवर(shil road) असलेल्या खड्ड्यांवरुन कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजवण्याच्या कामाला अद्यापही हवी तशी गती मिळालेली नाही. मात्र राजकारण प्रचंड तापताना दिसत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याला येणार म्हणून पालकमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून रस्त्यावरील खड्डे भरून घेतले होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिळफाटा मार्गे डोंबिवलीला यावे, मी स्वतः घेण्यासाठी शिळफाट्याला उभं राहतो अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर केली होती. त्याला उत्तर म्हणून खासदार श्रीकांत शिंदे(shrikant shinde) यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप घेणाऱ्या मनसे आमदारांनी एकदा प्रत्यक्ष कल्याण शिळ रोडवर फेरफटका मारावा असा टोला लगावला होता.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना कल्याण शीळ रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सल्ला दिल्यानंतर राजू पाटील आज थेट श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवलीतील बंगल्यासमोर दाखल झाले. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्याबाहेरील खड्डा दाखवला. मला फेरफटका मारण्याची गरज नाही. मी या मतदारसंघातच राहतो. मला या मतदारसंघाची पूर्ण माहिती आहे. मतदारसंघ हेच माझं घर आहे. आता राजकारण न करता खड्डे भरण्याचं काम करा, असा सल्ला राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांना दिला.

दरम्यान राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्या घराबाहेरील रस्ते दाखवल्यानंतर, आमदार राजू पाटील यांनी माझ्या बोलण्याची दखल घेतली आणि ते रस्त्यावर उतरले याबद्दल धन्यवाद! फुल टाईम आणि पार्ट टाईम लोकप्रतिनिधी कोण आहे, हे जनतेला चांगलंच माहिती आहे. चार महिने ट्विटरवर कोण होतं आणि रस्त्यावर उतरुन कोणी कामं केली हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी मला कोण फुल टाईम आणि पार्ट टाईम हे सांगू नये, अशी सडेतोड प्रतिक्रिया श्रीकांत शिदे यांनी दिली.