मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक कोंडी, पावसामुळे रेल्वेसेवाही ठप्प

काल रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासून जोर धरला. या पावसामुळे कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

मुंबई : काल रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने आज सकाळपासून जोर धरला. या पावसामुळे कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळली. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. दरड हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला. काही ठिकाणी घराघरांमध्ये पाणी भरल्याने मुंबईकरांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.   

कांदिवली येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दरड कोसळल्याने मीरा रोडहून मुंबईकडे येणारी वाहतूकही ठप्प झाली असून रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन ठप्प झाले आहे. डोंगराचा काही भाग एका समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मुंबईकरांना कालची रात्र जागून काढावी लागली आहे. तसेच रेल्वे रुळावरही (railway track) पाणी साचल्याने त्याचा अत्यावश्यक सेवेतील कामगारांना मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. कुर्ला आणि सीएसएमटी दरम्यानची हार्बर रेल्वेसेवाही बंद झाली आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्याने पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्ग ठप्प झाला असून मध्य रेल्वेवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.  मुंबईत दादर, कुर्ला, सायन,  मुलुंड, माटुंगा, हिंदमाता, अंधेरी, घाटकोपर, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, कांदिवली, बोरिवली, गोवंडी या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर जलमय झाला आहे. हिंदमाता परिसरात साचलेल्या पाण्याची पातळी दोन ते तीन फुटांवर गेल्याने या ठिकाणीही वाहतूक कोंडी झाली आहे.