मुरबाड शहराची प्रवेशद्वार कमान अनधिकृत ?

मुरबाड: मुरबाड शहराची प्रवेशद्वार कमान सध्या वादात अडकली आहे. यानिमित्ताने वातावरण तापले असताना आज ही प्रवेशद्वार कमान नगरपंचायतीने बांधली नसून या बांधकामास कोणतीही परवानगी दिली नसल्याचे कळवल्याने हे कमान प्रकरण आता गुंतागुंतीचे बनले आहे. 

या कमानीस स्वातंत्र्यदिनी घाईघाईने नाना धर्माधिकारी यांचे नाव देण्याचा झटपट बिनबोभाट सोहळा पार पडला. मात्र आता या कमानीस डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी आरपीआयने केली आहे. त्यामुळे गेली दोन वर्ष नगरपंचायतीच्या नाकावर टिच्चून दिमाखात उभ्या असलेल्या मात्र नगरपंचायतीच्या मालकीच्या नसलेल्या प्रवेशद्वारावरून मुरबाड नगरपंचायत चांगलीच गाजण्याची शक्यता दिसत आहे.

मुरबाड शहराच्या मुख्य बाजारपेठ रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी प्रवेशद्वार कमान उभारण्यात आली आहे.या कमानीला मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेट, तसेच नाना धर्माधिकारी यांचे नाव देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे .तर मुरबाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असल्याने या प्रवेशद्वाराला बाबासाहेबांचे नाव द्यावे अशीही मागणी जोर धरू लागली आहे.

स्वातंत्र्यदिनी या कमानीस घाईघाईने नाना धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले.या कमानीच्या नामकरणाच्या सोहळ्यास आमदार किसन कथोरे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.मुख्याधिकारी परितोष कंकाळ मात्र या सोहळ्यास गैरहजर होते. या सोहळ्यानंतर लागलीच आर.पी.आय.मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे युवा अध्यक्ष अण्णा साळवे यांच्या नेतृत्वाखाली या प्रवेशद्वाराला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करत संतप्त आंदोलन करण्यात आले होते. सोमवारी याच प्रकरणी जिल्हाअध्यक्ष बाळाराम गायकवाड यांनी मुरबाड नगरपंचायत प्रशासनाची भेट घेऊन प्रवेशद्वारास बाबासाहेबांचे नाव देण्याची मागणी करत निवेदन दिले. मात्र या सर्व गोंधळात अधिकच भर पडली आहे.नगरपंचायतीने हे प्रवेशद्वार नगरपंचायतीने बांधलेच नाही व या बांधकामास नगरपंचायतीने परवानगीही दिली नसल्याचे एका पत्रान्वये कळवल्याने या प्रवेशद्वाराच्या मालकीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

जर नगरपंचायतीच्या मालकीचे हे प्रवेशद्वार नाही तर ते बांधले कुणी? हे अनधिकृत बांधकाम सुरू असतांना नगरपंचायतीने यात हस्तक्षेप का केला नाही.? हे प्रवेशद्वार नगरपंचायतीच्या मालकीचे नाही तर मग कुणाच्या मालकीचे..? बांधकामास परवानगी न घेतलेले हे प्रवेशद्वार नगरपंचायत अनधिकृत म्हणून घोषित करणार काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले असून आता याप्रकरणी नगरपंचायत काय भूमिका घेणार ? याकडे मुरबाड शहराचे लक्ष लागले आहे.