मुरबाडमधील पटेल मॉलमध्ये खराब अन्नपदार्थांची होतेय विक्री

मुरबाड: मुरबाड शहरातील पटेल्स आर मार्ट या मॉलमध्ये खराब अन्नपदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार नागरिकांनी मुरबाड नगरपंचायतीकडे केली आहे. येथील पटेल शॉपिंग मॉलमध्ये खराब अन्नपदार्थ व वस्तूंची विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी असतानाच शनिवारी एका नागरिकाने येथून खजूर घेतले असता या खजूरांमध्ये अळ्या आढळून आल्या.तसेच हे खजूर कुजलेल्या स्थितीत दिसून आले.

 या अन्नपदार्थांचा मुरबाड नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे.या अन्नपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवण्यात येतील, असे नगरपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. गेले अनेक दिवस लॉकडाऊनमुळे दुकाने आणि विक्री आस्थापने बंद असल्याने अनेक सीलबंद अन्नपदार्थांची विक्री झाली नाही. त्यामुळे हे अन्नपदार्थ खुप दिवस पडून असल्याने नागरिकांनी असे अन्नपदार्थ विकत घेताना ते काळजीपूर्वक पाहूनच घेण्याची आवश्यकता  आता निर्माण झाली आहे.