bjp and congress

एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपा आणि काँग्रेस पक्ष राजस्थानमध्ये एकत्र(bjp and congress together in Rajasthan) आल्याचे पाहायला मिळाले. एका उमेदवारासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आणि पहिल्यांदाच हे समीकरण पाहायला मिळाले. राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात या नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे.

डुंगरपूर: राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा राजस्थानात आला आहे. राजकारणात अशक्य काहीही नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले भाजपा आणि काँग्रेस पक्ष एकत्र आल्याचे येथे पाहायला मिळाले. एका उमेदवारासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आणि पहिल्यांदाच हे समीकरण पाहायला मिळाले. राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात या नव्या राजकीय समीकरणाचा उदय झाला आहे.

काँग्रेसच्या मदतीने भाजपला जिल्हा प्रमुखपद

डुंगरपूर जिल्हा परिषेदेत काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपाचा जिल्हा प्रमुख निवडून आला आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या भाजपाच्या सूर्या अहारी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने भारतीय ट्रायबल पार्टीचे (बीटीपी) समर्थन असणाऱ्या पार्वती यांचा एका मताने पराभव केला आणि जिल्हा प्रमुख पद मिळवले. जिल्हा परिषदेच्या २७ जागांपैकी १३ जागांवर बीटीपीचे समर्थन असणारे अपक्ष उमेदवार निवडून आले होते. तर दुसरीकडे काँग्रेसला सहा आणि भाजपाला आठ जागांवर विजय मिळाला होता. जिल्हा परिषदेत बीटीपीचे समर्थन असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने त्यांचा उमेदवार जिल्हा प्रमुख होणार हे पक्क होते. याचवेळी बीटीपीला रोखण्यासाठी पहिल्यांदा भाजपा आणि काँग्रेसने हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच जिल्हा प्रमुख निवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिला नाही.

एका मताने झाला विजय
भाजपाने आपल्या उमेदवार सूर्या अहारी यांना अपक्ष म्हणून उभे केले तर दुसरीकडे बीटीपीचे समर्थन असणाऱ्या पार्वती यांनी अर्ज दाखल केला. यानंतर मतमोजणी झाली, ज्यामध्ये सूर्या अहारी यांनी भाजपाची आठ आणि काँग्रेसची सहा अशी एकूण १४ मते मिळाली. तर दुसकीकडे पार्वती यांनी एकूण १३ मतं मिळाली. फक्त एका मताने सूर्या अहारी यांचा विजय झाला. दरम्यान, स्थानिक पातळीवरील या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा राजस्थानसह संपूर्ण देशात सुरू आहे.

बीटीपीने गहलोत सरकारचा पाठिंबा काढला
राजस्थानात अशोक गहलोत सरकारसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. बीटीपीच्या दोन आमदारांनी काँग्रेसच्या गहलोत सरकारला दिलेला पाठिंबा काढला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला गहलोत सरकारने विधासभेत बहुमत सिद्ध केले, त्यावेळी या दोन आमदारांनी गहलोत यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आता त्यांनी सरकारचा पाठिंबा काढल्याने राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसवर नाराज असल्याने राजकुमार रोत आणि रामप्रसाद यांनी पक्षाचे अध्यक्ष महेश वसावा यांना काँग्रेसचा पाठिंबा काढण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी गहलोत सरकारचा पाठिंबा काढला आहे. पायलट यांच्या बंडाच्यावेळी आणि राज्यसभेच्या निवडणुकीतही त्यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर काँग्रेसशी संबंध तोडण्याची वेळ आल्याचे या दोन आमदरांनी सांगितले.