मुरबाडमधील ‘त्या’ डॉक्टरवर कोणतीही कारवाई नाही ?

विशाल चंदने, मुरबाड: रुग्ण फक्त दोन तास जगू शकतो.. दहा हजार रुपये द्या… गॅरंटी घेतो, अशी रुग्णाच्या नातेवाईकांना भीती दाखवून उपचारासाठी दहा हजार रुपये उकळणाऱ्या मुरबाडच्या(murbad) सरकारी ग्रामीण रुग्णालयातील(hospital) डॉ.नरहरी फड याच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने फड यांची पाठराखण केल्याची जोरदार चर्चा मुरबाडमध्ये सुरू आहे. हे डॉक्टर(doctor) रुग्णांकडून खाजगी दवाखान्याप्रमाणे पैसे उकळत असूनही त्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याने आर्थिक लुटीची ही मोठी साखळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

डॉ.फड हे सात ते आठ महिन्यांपूर्वी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी(medical officer) म्हणून काम करत होते.मात्र प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतींना तसेच गंभीर रुग्णांना शासकीय संदर्भ सेवा पुरवण्याऐवजी खाजगी दवाखान्यांचा रस्ता दाखवण्याच्या अनेक तक्रारी त्याच्याविरोधात असल्याने त्याची उचलबांगडी म्हसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली. असे असतानाही आर्थिक लुटीची ‘चटक’ लागलेल्या फडने आपली वर्णी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात लावून घेतली.
ज्या ठिकाणी डॉ.फड याच्या कारभाराविरोधात तक्रारींचा ढीग असताना त्यांची त्याच ठिकाणी प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत शंका घेण्यास जागा निर्माण झाली आहे. सध्या या प्रकरणाच्या निमित्ताने शासकीय आरोग्य यंत्रणेची काळी बाजू उजेडात आली असली तरी त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. कोरोना सारख्या गंभीर संकटात सर्वसामान्यांची आर्थिक बाजू धुळीस मिळाली असताना त्यांच्याकडून उपचारांचे पैसे लाटणारा फड म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील कलंक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांत व्यक्त होत आहेत. मनसेने फड याच्यावर निलंबनाची मागणी केली आहे तर त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी विविध सामाजिक संस्था, संघटना व सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

डॉ.फड यांची म्हसा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती.या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – डॉ.मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी- ठाणे जिल्हा परिषद

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने डॉ.फड यांची मुरबाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती.त्यांना येथून हटवण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल.
                                                                                              – डॉ.कैलास पवार, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक